एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट (Photo - Social Media)
Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांची तब्येत खालावली होती. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळताच राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन अहिर आणि मिलिंद देवरा देखील उपस्थित होते.
भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टरांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.
या भेटीत केवळ प्रकृतीची विचारपूस झाली नाही, तर राज्यातील दुष्काळ आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबतही चर्चा झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. पवार साहेबांनी डिस्चार्जसाठी घाई करू नये आणि काही दिवस विश्रांती घ्यावी, असा सल्लाही आपण दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, शरद पवारांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रांगच लागली आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, राजनाथ सिंह, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही फोन करून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत पवारांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
सध्या शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ans: पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते.
Ans: शरद पवारांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यात सुधारणा होत आहे. डॉक्टरांनीही प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं असून लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
Ans: एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आणि गौतम अदानी यांच्यासह अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. याशिवाय अनेक नेत्यांनी फोनवरूनही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.






