कडावमध्ये पत्रकारांची निदर्शने
कर्जत: कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी बसथांबा बेकायदेशीररित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी (ता.२४) कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत २ जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची तसेच त्या जागेवरील बांधकाम बद्दल लावण्यात आलेले असेसमेंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा १० जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे आल्याने संताप आणखी वाढला आहे.
कडाव गावात १९७७-७८ साली एसटी महामंडळाने अधिकृत बसथांबा बांधला होता. परंतु आता विनोद काशिनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची तक्रार कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झाले आहे.त्यानंतर संबंधित विषयाची बातमी देणारे पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना एसटी थांबा बळकावनारे व्यक्तीकडून मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे संतप्त होत कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार कडाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहचले.स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय याबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.
सबंधित विषयी पत्रकारांनी ग्राम सचिवालय समोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी गिरासे हे कार्यालयातून बाहेर आले आणि तळमजल्यावर जमलेल्या पत्रकारांना भेटले.तेथे पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ग्रामपंचायत अधिकारी गिरासे यांनी कार्यवाही सुरू असून कागदोपत्री परवानगी आल्यावर कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.
या निषेध आंदोलनात तक्रारदार प्रभाकर गंगावणे तसेच पत्रकार संतोष पेरणे,नरेश जाधव,भूषण प्रधान,कैलास म्हामले,रमाकांत जाधव,महेश भगत,कृष्णा सगने,किशोर गायकवाड, मोतीराम पादिर, रजनीकांत पवाळी,अजय गायकवाड,गणेश पवार,सतीश पाटील,आनंद सकपाळ,गणेश मते,जगदीश दगडे,कांता हाबळे, रोशन दगडे,गणेश लोट, नरेश कोलंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवण्याची ठाम मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात २ जुलै २०२५ पर्यंत कारवाई न झाल्यास १० जुलैपासून कडाव येथील ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. उपस्थितांनी एकमुखीने सांगितले की, सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने याप्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे.
गेली दहा वर्ष कडाव ग्रामपंचायत आणि एसटी डेपो यांना अनधिकृत बस थांबाबाबत पत्रव्यवहार करीत असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही.वेळीच दखल घेतली असती तर अनधिकृत गाळा उभारणाऱ्या व्यक्तींपैकी विनोद पवाली नामक व्यक्तीने मला धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. प्रशासनाने १० जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही सारे पत्रकार बांधव कडाव ग्रामपंचातसमोर बेमुदत उपोषण करणार आहोत.
– प्रभाकर गंगावणे, तक्रारदार