मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी जयदीप आपटेला २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला केवळ ९ दिवसच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून सरकारकडून आणि पोलिसांकडून जयदीप आपटेच्या विरोधात मालवण न्यायालयात सक्षम बाजू न मांडल्यानेच त्याला दिलासा मिळाला असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.
हे देखील वाचा- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत पडली पहिली ठिणगी?; आता…
जयदीप आपटेची अटक हि प्री प्लॅन
सुरुवातीला जयदीप आपटेचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले होते. त्यानंतर १० दिवसांनी ४ सप्टेंबर रोजी तो त्याच्या घराजवळच पोलिसांना सापडला होता. जयदीप आपटे याला अटक केल्यानंतर अन्य कोणाही संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. व आता केवळ ९ दिवसांत जयदीप आपटेची पोलीस कोठडी संपल्याने जयदीप आपटेची अटक हि प्री प्लॅन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर या घटनांवरून सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह खाते आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्या संगनमताने पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला पोलिसांकडून अभय देण्यात आल्याची टीका कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 26 ऑगस्ट रोजी पडला. 8 महिन्यापूर्वी उभारलेला हा पुतळा पडल्याने मुर्तीकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंसलटेंट चेतन पाटील यांनी या पुतळ्याची उभारणी केली होती. पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील जनसामान्यांची भावना अतिशय तीव्र झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा तीव्र निषेध केला गेला होता. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. विरोधी पक्षातील नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन आंदोलन केले होते. महाराष्ट्रामध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजांची आणि शिवभक्तांची माफी मागितली होती. पूर्ण देशभर या घटनेचे पडसाद उमटले होते.