कुडाळ-खासदार नारायण राणे
कुडाळ : १२ जून रोजी कुडाळ-विजापूर एसटी बस घेऊन गेलेल्या चालक रमेश मांजरेकर आणि वाहक सचिन रावले यांना विजापूर आगारातील भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने विजापूर आगारात जोरदार धडक दिली. त्यामध्ये कुडाळ आगारातील दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामधील रमेश मांजरेकर या चालकाचा पाय काढण्यात आला. या अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांना भविष्यात परिवहन महामंडळाकडून नोकरी बाबतची हमी मिळावी यासाठी मागणी करण्यात आली आहे.
त्याचबरोबर ज्या विजापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे हा अपघात झाला त्यांची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, विभागीय सरचिटणीस रोशन तेंडोलकर, विभागीय प्रसिद्धप्रमुख मिथुन बांबुळकर तसेच कुडाळ आगारातील कर्मचारी एम. एन. आंबेडकर, निलेश वारंग, तावडे, साई पारकर यांनी रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते.
सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निवेदन पाठवून या गंभीर दुर्घटनेकडे लक्ष वेधले असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही यासंदर्भात कुडाळ आगारातील कर्मचारी भेट घेणार आहेत.
या संघटनेने दिलेल्या निवेदनात या गंभीर दुर्घटनेबाबत प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे कुडाळ आगारात काम बंद आंदोलन झाल्याचे म्हटले असून याबाबत प्रशासनाला योग्य ती समज द्यावी अशी मागणी केली आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही विभाग नियंत्रकाशी चर्चा केली होती. त्यानंतर जत आगाराच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन विजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला अशी माहिती सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आली.