सौजन्य - नवराष्ट्र टीम
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. पक्षात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची यादी तयार आहे. काही भागांत प्रवेश करु इच्छिणाऱ्यांनी फ्लेक्सबाजी करण्यास सुरुवात केली आहे. इतर पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षप्रवेश दिला जात असल्याने भाजपचा मुळ कार्यकर्ता नाराज हाेत आहे. महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने शहर भाजपची कोअर कमिटीची बैठक रविवारी झाली. त्या बैठकीत या फ्लेक्सबाजीचे पडसाद उमटले.
वारजे भागात एकाला पक्षप्रवेश दिल्याबद्दल एका आमदाराने बैठकीत नाराजी व्यक्त केली. पक्षाकडे ४२ जणांची प्रवेशाची यादी तयार झाली असल्याच्या वृत्ताने अन्य आमदारांमध्येही नाराजी होती. एकूणच पक्ष प्रवेशावरून बैठकीत गरमागरम झाल्यानंतर त्यावर तोडगा म्हणून अन्य पक्षातील इच्छुकांना प्रवेश देताना आमदारांसह कोअर कमिटीची सहमती घ्या मगच निर्णय घ्या. पुढे जाऊन प्रॉब्लेम नको, असा सूर आवळत चर्चेला पूर्णविराम देण्यात आला. तर एका माजी मंत्र्यांनी थेट मुद्याला हात घालत संभाव्य वादाकडे कमिटीचे लक्ष वेधले. ते म्हणाले,‘ आठ वर्षांनी महापालिकेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे. त्यातून वाद होण्याची शक्यता अधिक आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी देखील खूप आहे. परिणामी पुढे जाऊन हे वाद पक्षाच्या अंगलट यायला नको. कार्यकर्त्यांची समजूत काढली पाहिजे,’ असा अनुभवाचा सल्ला दिला.
पुणे महापालिका निवडणुक स्वबळावर लढण्याच्या भुमिकेवरून भाजपने पुन्हा एकदा घुमजाव केले आहे. ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे शहर भाजपकडून रविवारी अधिकृतपणे जाहीर केले गेले. परंतु ‘पुढे जाऊन काय निर्णय होईल, पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील हे आम्हाला माहिती नाही,’ असे सांगून संभ्रम कायम ठेवला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहर भाजपची कोअर कमिटीची बैठक पुण्यात झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह आमदार, विविध संघटनांचे अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते. आगामी निवडणूक ही मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय या बैठक घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ आणि पाटील यांनी ही माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले,‘‘ महापालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी ही बैठक झाली. त्यामध्ये विविध कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत.’’ तर मोहोळ म्हणाले,‘‘ बारा महिने काम करणारी आमची संघटना आहे. मोठ्या निवडणुकीला सामोरे जाताना एक प्रक्रियेचा भाग म्हणून ही बैठक आहे. निवडणुकीच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये युतीबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवर दिला होता. महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याची आमची मागणी आहे. परंतु पुढे जाऊन काय निर्णय होईल हे आता आम्हाला माहिती नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर चर्चा होईल’’.
पक्ष प्रवेश होणार
मित्रपक्षातील इच्छुकांना प्रवेश देण्यासंदर्भात मोहोळ महणाले, जिथे एकमत होईल तेथे प्रवेश होईल. जिथे पक्षाचा कार्यकर्ता सक्षम असेल, तिथे कार्यकर्त्याला प्राधान्याने संधी दिली जाईल असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय हा त्यांनी घ्यावा हा त्यांचा प्रश्न असल्याचे माेहाेळ यांनी नमूद केले. त्याचवेळी महायुतीसाठी आम्ही आग्रही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजपासून अर्ज विक्री
पक्षाकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांकडून आजपासून अर्ज मागविण्यात येणार आहेत. मंगळवारपर्यंत ही मुदत असणार आहे. पक्षाच्या शहर कार्यालयात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल अर्ज प्रदेशाकडे दिले जातील. त्यांच्याशी चर्चा करून मग अंतिम स्वरूप दिले जाईल, असेही मोहोळ यांनी सांगितले.
जाहीरनाम्यात जनतेच्या सूचना घेणार
पक्षाकडून आतापर्यंत जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली गेली. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला. महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा तयार करताना यंदा मात्र मतदारांच्या घरोघर जाऊन त्यांच्याकडून शहर विकासाबाबत त्यांची मते आणि सूचना घेणार आहोत. त्या सूचनांचा समावेश जाहीरनाम्यामध्ये करण्यात येणार आहे. तर प्रभागनिहाय पक्ष संघटनेच्या बैठक घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात येणार आहोत, असेही मोहोळ म्हणाले.






