कणकवली : दोन महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दारुमच्या माळरानावर तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी तिचा मित्र व अन्य दोघांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४,रा.दारुम), गणेश प्रकाश गुरव (२४,रा.शिरवली, देवगड) या तिघांना पोलिसांनी अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिडीत तरुणीची ऑगस्ट महिन्यात बाळकृष्ण तांबे याच्याबरोबर ओळख झाली होती. कालांतराने त्या दोघांची मैत्री होऊन तिचे प्रेमात रूपांतर झाले. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ती तरुणी बाळकृष्ण याला भेटायला तळेरे येथे आली. त्या दोघांनी चायनीज खाऊन देवगड येथे बसने फिरायला गेले. पुन्हा तळेरे येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आले. रात्री उशीर झाल्याने तळेरे, आनंदनगर येथे त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते नाद येथे गेले. तेथे बाळकृष्ण याने नातेवाईकांना आपल्याला या युवतीशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी आमच्याकडे आता पैसे नाहीत, नंतर बघूया, तू घरी जा, असे त्या तरुणीला त्यांनी सांगितले. त्यानंतर बाळकृष्ण त्या तरुणीला घेऊन तळेरे येथे आला.तिला चायनीज सेंटर मध्ये बसविले.
तसेच तेथून तो निघून गेला. काही वेळाने तिने त्याला फोन केला असता आपण दारू प्यायला एका दुकानात बसलो असल्याचे त्याने सांगितले. ती त्या दुकानाच्या ठिकाणी पोहचल्यावर तेथून ते दोघे कासार्डे येथे गेले. तो तिला तिथे सोडून निघून गेला. काही वेळाने ती युवती बसस्थानकात पोहचली. तिने त्याला परत फोन केला. त्यानंतर तो शिरवली येथील गणेश गुरव याला त्याच्या रिक्षासह घेऊन आला. त्यानंतर एका वाईन शॉपीमधून त्या दोघांनी वाईनची बॉटल आणली. रिक्षात परत आल्यावर बाळकृष्ण याने त्या तरुणीला वाईन प्यायला लावली. त्यानंतर रिक्षातून तिला दारुम येथे ते घेऊन गेले. तेथील माळरानावर ते थांबले असता शैलेश तांबे हा रिक्षा घेऊन तिथे आला. तसेच पहिल्या रिक्षेत तो त्या तरुणीच्या बाजूला येऊन बसला. काही वेळाने त्या तरुणीने वाईन प्यायलेली असल्याने तिला गुंगी आली. त्याचा फायदा घेऊन त्या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
तो पर्यंत सायंकाळी ४.३० वाजले होते. ५.३० वाजण्याच्या सुमारास त्या तरुणीला त्यांनी तिच्या घराजवळ सोडले. त्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तीने घडलेल्या प्रकाराबद्दल कुटुंबियांना माहिती दिली. तसेच कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा नोंद करून त्यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्या तिघांवर सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर सावंत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.