मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण फारच पेटलं आहे. या प्रश्नावर महाराष्ट्रासह सीमावर्ती भागांत अनेकदा तीव्र आंदोलनं झाली आहेत. या वादावरून दोन्ही राज्यांमध्ये न्यायालयीन लढाईदेखील सुरू आहे. सध्या दोन्हीही राज्यातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असल्याने सीमाभागातील वातावरण अधिकच चिघळू लागले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्रानं सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद केंद्रानं सोडवण्याच्या मागणीनं जोर धरला असतानाच कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिकेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पुतळा दहन करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या (Kannada Rakshana Vedike) कार्यकर्त्यांनी गदगमध्ये या पुतळ्याचं दहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन केल्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचं मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधून व्यक्त केली जात आहेत. कर्नाटकातील गदगमध्ये महारष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आहेत. यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुतळ्याचं दहन करत संताप व्यक्त केला.