कर्जत/संतोष पेरणे : मुंबईमधील झोपडपट्टी हलवली जात असून कर्जत तालुक्यात नेरळ शेलू परिसरात मोठ्या प्रमाणावर चाळी बांधल्या जात आहेत. त्या चाळींमध्ये घर घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना स्थानिक पातळीवर बिल्डरकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.नेरळ परिसरातील अनेक चाळींमध्ये महावितरण कंपनीचे विजेचे मीटर नाहीत,मात्र त्या चाळींमध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू असून महावितरण कंपनीचे दुर्लक्ष की महावितरण कंपनीचं साटंलोटं याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
नेरळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आणि नव्याने बांधण्यात येत असलेल्या चाळींच्या विजेचा प्रश्न याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.या चाळीवर महावितरण कंपनीची कृपादृष्टी असल्याचे दिसून येत आहे.अनेक चाळी मध्ये विजेचे कनेक्शन नाही, विद्युत मीटर नसताना देखील विद्युत खांबावरुन वीज कनेक्शन घेतले जात आहेत. या प्रकारे कोणालाही न जुमानता विद्युत चोरीचे प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत.असे प्रकार सुरू असताना महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे.नेरळ परिसरात अनेक वसाहतींमध्ये असे प्रकार सुरु असून नेरळमधील मोहाची वाडी जवळ असलेली कोंबळवाडी येथे श्री साई परफेक्ट होम मधील चाळींमध्ये देखील असे प्रकार सुरू आहेत. एवढं सगळं सुरु असून देखील त्याचा महावितरण कंपनीला थांगपत्ता नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. तेथील चाळींमध्ये लोक राहात असून देखील तिथे चक्क विद्युत मीटरच नसल्याचे समोर आले आहे.मात्र त्या चाळी मध्ये विजेचे दिवे मात्र पेटलेले असतात.
दरम्यान तेथे राहणारे रहिवासी हे गेली सात आठ वर्ष तेथे राहत असून त्यांना कोणत्याही प्रकारचे लाईट बिल येत नाही. त्यांच्या रूमसाठी देण्यात आलेले मीटर हे थकित बिलामुले महावितरणाने काढून नेले आहेत.परंतु गेली सात-आठ वर्ष ही लोक चोरून विजेचा वापर करत आहेत. महावितरणाचे कर्मचारी अनेक वेळा या ठिकाणी जात असतात.परंतु त्यांच्याकडून त्या चालीधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.चालीसाठी लागणाऱ्या पाण्याची टाकी देखील मोटर पंपाने भरली जाते त्या मोटर पंपाला देखील मीटर नसल्याचे समोर आले आहे. हे सर्व महावितरणच्या नजरेखाली होत असून महावितरण बघ्याची भूमिका घेत आहे.आता या सर्व गोष्टीकडे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.