कर्जत/संतोष पेरणे: तालुक्यातील धरण प्रकल्पाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.न्यायालयाने धरण प्रकल्पाना हिरवा कंदील दिला मात्र न्यायालयाच्या या निर्णवर गावातल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार आहे. त्याप्रमाणे चिल्हार नदीवर देखील शिलार येथे धरण बांधले जाणार आहे. म्हणजे तालुक्यात अशा दोन धरणांना न्यायालायाने परवानगी दिली आहे. .या धरणाच्या कामासाठी शासनाने निविदा काढली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांचा या दोन्ही धरणांना विरोध असून बोरगाव येथे होणाऱ्या पोशिर धरणाला 30 वर्षे येथील शेतकरी विरोध करीत आहेत.दरम्यान या दोन्ही धरणांची पर्यावरण सुनावणी शासनाने घेतली नाही आणि असे असताना देखील निविदा काढण्यात आल्याने सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे हा प्रकल्प ?
नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे पोश्री नदीवर आणि चिल्लार नदीवर शिलार येथे मध्यम धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे.पोशीर धरणासाठी ६३९४ कोटींच्या तर शिलार धरणासाठी ४८६९ कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. भीमाशंकर अभयारण्य आणि येथील डोंगरात उगम पावलेली पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग गावांच्या हद्दीत धरण बांधले जाणार आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत मधील या भागात धरण बांधण्याचे २००५ मध्ये महाराष्ट्र सरकार कडून कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरण कडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर धरणाचे सर्वेक्षण करणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थ पिटाळून लावत होते.त्यामुळे बोरगाव येथे होणाऱ्या धरणाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे.बोरगाव,चई, चेवणे,उंबरखांड,भोपळेवाडी,पेंढरी आणि बोन्डेशेत ही गावे विस्थापित होणार आहे. शेतकर्यांचा विरोध असलेल्या या धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने २० मे रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील शिलार,धोत्रे, धोत्रे वाडी या भागात नवीन धरण होणार असून या धरणाच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८६९ कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. शिलार धरणामुळे भविष्यात चिल्लार नदी बारमाही वाहती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणा धरण बांधले जाणार असल्याने कर्जत तालुक्याच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविली जाणार आहे.
का आहे गावकऱ्यांचा विरोध ?
कर्जत तालुक्यातील दोन्ही नवीन धरणासाठी शासनाने जमिनीचे संपादन केलेले नाही आणि असे असताना देखील शासनाने धरणाच्या कामाच्या निविदा काढल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे.या दोन्ही धरणांना स्थानिक पातळीवर विरोध असून शासन स्तरावर होणारी पर्यावरण सुनावणी हवामान बदल सुनावणी शासनाने घेतली नाही.वन जमिनीबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही आणि त्याआधीच निविदा काढण्यात आली आहे.
पोशीर धरणाच्या धरण,विद्युत विमोचक,सांडवा प्रणाली,पाणीपुरवठा याबाबत ही 2135 कोटींची निविदा आहे.कोकण पाटबंधारे महामंडळाच्या रायगड पाटबंधारे विभागाने ही निविदा प्रसिद्ध केली आहे. शिलार धरणासाठी देखील 1667 कोटींची निविदा शासन स्तरावर पाटबंधारे विभागाने काढली असून या दोन्ही धरणांना कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत आणि ओलमन ग्रामपंचायत मधील शेतकऱ्यांचा होत आहे. शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शासन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, अशी संतप्त भावना देखील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या धरणासाठी आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.आम्ही सातत्याने हा विरोध नोंदवत असून शासन स्तरावर आमच्या निवेदनाची साधी दखल घेतली जात नसल्याने आम्ही कोणाकडे दाद मागायची.मात्र तरी देखील आम्ही सनदशीर मार्गाने न्याय मागणार असून रायगड जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन दिले जाणार आहे, असं पोशीर धरण विरोधी संघर्ष समितीचे सचिव सतीश पाटील म्हणाले आहे.