मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीमधील तरुण आमदारांवर गंभीर आरोप केले आहे.आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रोशी (Baramati Agro) निगडित ठिकाणी छापेमारी केली. यामुळे अडचणीमध्ये आलेल्या रोहित पवारांवर किरीट सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर देखील सोमय्या यांनी आरोप करत सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांच्या मित्राने कोविड सेंटरमध्ये अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल गोम्सने जवळपास १६० कोटी रुपये महानगरपालिकेचे ढापले आहेत. दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर मध्ये फक्त ३८ कोटी रुपये खर्च केले. त्याच्या समोर १८० कोटींचे रेंट इकबाल सिंह चाहल यांनी राहुल गोम्स कन्सल्टन्सीला दिले आहेत. त्या राहुल गोम्सला ताबडतोब अटक करावी” अशा शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांकडे आदित्य ठाकरेंविरोधात मागणी केली आहे.
तसेच सोमय्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने अगदी कमी पैशामध्ये कन्नड साखर कारखाना खरेदी केल्याचा घणाघात केला आहे. रोहित पवारांची याबाबत ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले, “रोहित पवारांच्या बारामती अग्रोने चीटिंग करून कन्नड सहकारी साखर कारखाना ज्याची २५० ते ३०० कोटीच्या घरामध्ये आहेत ती अत्यंत कमी पैशामध्ये खरेदी केली. याबाबत त्याच्यांविरोधात जुलै २०२१ मध्ये पोलिस, ईडी, इन्कमटॅक्स सगळीकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यातील तपासाचा एक भाग म्हणून आज ईडीने काही ठिकाणी छापे मारले आहेत. आयकर विभागाची देखील चौकशी सुरु आहे. तो कारखाना एकदम स्वस्तात रोहित पवार यांच्या बारामती अग्रोने घेतला आहे त्यामुळे योग्य अशी चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच रोहित पवार यांना हिशोब तर द्यावाच लागणार अशा शब्दांमध्ये किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांना आव्हान दिले आहे.