सात तालुक्यामध्ये 15,845 बोगस प्रमाणपत्र; बांगलादेशी घुसखोरीवरून किरीट सोमय्यांचा आरोप
अकोला आणि अमरावती जिल्हा बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या यांनी अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होता. तशी तक्रार त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अमरावती, नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
याचसंदर्भात किरीट सोमय्या यांनी नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. महाविकास आघाडीने विधानसभेत व्होट जिहादसाठी हे घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला.
अकोला – 4849
अकोट – 1899
बाळापूर – 1468
मुर्तिजापूर – 1070
तेल्हारा – 1262
पातूर – 3978
बार्शिटाकळी – 1319
भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की , “महाराष्ट्रात ४० लहान-मोठी शहरं अशी आहेत, जिथे ३० ते ७५ वर्षे वयोगटातील व्यक्तींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी केलेल्या अर्जांमध्ये असामान्य वाढ झाली आहे. ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. मालेगाव, अमरावती व अकोलासह अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, तिथे बेकायदा मुस्लिम बांगलादेशी लोकांची संख्या सर्वाधिक आहे.” २०२३ मध्ये केंद्र सरकारने तहसीलदारांना अधिकार देऊन जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सोपी केली होती. यापूर्वी जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम दंडाधिकाऱ्यांकडे होतं. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशिष्ट कालावधी निश्चित केला गेला होता.
यामुळे अर्जदारांना बनावट रेशन, आधार व पॅन कार्ड सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणं जास्त सोपं झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. “बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवणं ही एक प्रशासकीय प्रक्रिया असली तरी देशहिताच्या कोणत्याही मोहिमेत राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वाची असते. आमची मोहीम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत करील, असही ते म्हणाले.
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा पोलिसांनी केल्यानंतर भाजप नेत्यांनी हा मुद्दा आणखीच उचलून धरला आहे. दुसरीकडे सैफवर हल्ला करणाऱ्याच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी देखील बांगलादेशी घुसखोरांविरोधातील आपल्या कारवाईला वेग दिला आहे. राज्यातील ३० ते ७५ वर्ष वयोगटातील व्यक्तींनी जन्म प्रमाणपत्रांसाठी केलेल्या अर्जांमध्ये अचानक वाढ झाल्याने महायुती सरकारने चिंता व्यक्त केली आहे. जिल्हा अधिकाऱ्यांनी जन्म प्रमाणपत्र देताना सावधगिरी बाळगावी, असे निर्देशही सरकारकडून देण्यात आले आहेत.