पुणे / दीपक मुनोत : शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha) महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे मावळते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे. २०१९ घ्या निवडणुकीत कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव करून दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हे यांच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटील यांचा प्रचार करत आहेत.
लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत छगन भुजबळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली असे सांगितले जाते. बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघानंतर शिरुर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा मतदारसंघ आहे. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी मोर्चा आणि विविध मतदारसंघात असलेले स्थानिक प्रश्न यांचा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो.
गत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांनी यंदा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली. गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी, छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ वढू-तुळापूर, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेले आळंदी तीर्थ क्षेत्र,बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर, हुतात्मा राजगुरुंचे जन्मस्थळ यांचा समावेश आहे.
या लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील, खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील, शिरुरमध्ये अशोक पवार, भोसरीत भाजपचे महेश लांडगे तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे आमदार आहेत.
राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सलग तीनवेळा या मतदारसंघात विजय मिळवण्याची किमया साधली होती. आता शरच्चंद्र पवार राष्ट्रवादीचे अशोक पवार वगळता अजित पवार राष्ट्रवादी गटाचे ४ तर भाजपचा १ आमदार असून ही बाब आढळराव पाटील यांच्यासाठी जमेची आहे.
दुसरीकडे सामान्य लोकांमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमुळे डॉ. कोल्हे प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच शरद पवार यांच्या सर्वात जवळचे नेते असल्याने त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. अशा परिस्थितीत शिरुरचा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात असून अमोल कोल्हे गड राखण्यात यशस्वी होणार का हा प्रश्न आहे.
दांडगा जनसंपर्क आणि अतिआत्मविश्वास
शिरुरच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करणाऱ्या आढळराव पाटील यांचे स्वत:चे असे एक वेगळे स्थान आहे. या मतदारसंघात आढळराव पाटील यांच्याकडे दांडग्या जनसंपर्काची शिदोरी आहे. त्यांनी शिरुरच्या मतदारांची नस माहिती आहे. मात्र, याबाबतचा अतिआत्मविश्वास त्यांना २०१९ मध्ये नडला होता. याबाबतची काळजी त्यांना यंदा घ्यावी लागेल. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील शिरुर मतदारसंघ अमोल कोल्हे यांच्या ताब्यातून पुन्हा खेचून आणणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.