खेड : गेले चार महिने पावसाळी वेळापत्रकानुसार कोकण रेल्वेच्या गाड्या जात होत्या. पावसाळी वेळापत्रकामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा वेग मंदावला होता. मात्र आता नव्याने सुरु होणाऱ्या वेळापत्रकामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेगाड्यांसाठी लागू करण्यात आलेले पावसाळी वेळापत्रक सोमवारी संपुष्टात आले असून आता जलद गतीने गाड्या धावणार आहेत.
२१ ऑक्टोबरपासून वेग मर्यादा वाढल्याने कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने कोकणवासियांसह पर्यटक सुखावले. पावसाळी वेळापत्रकानुसार रेल्वेगाड्यांचा धावणाऱ्या वेग मंदावला होता. शिवाय रेल्वेगाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकानेही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३१ ऑक्टोबर ऐवजी २० ऑक्टोबरलाच पावसाळी वेळापत्रक संपुष्टात आले. कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचा वेग वाढल्याने प्रवाशी सुखावले आहेत. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जलद गतीने गाड्या पुन्हा धावण्यासाठी रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती आणि तांत्रिक काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे बिगर पावसाळी वेळपत्रक लागू केल्यामुळे आता गाड्यांचा वेग ही वाढेल आणि वेळेची बचत होणार असल्याने कोकणवायियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. दिवाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्या व दिवाळी स्पेशल विक्रमी गर्दीने धावत आहेत. मुंबईहून गावाकडे येणाऱ्या कोकणवासियांची संख्याही सर्वाधिक आहे. पावसाळी वेळापत्रक संपुष्टात आल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्व रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्या.
खेड रेल्वेस्थानकात गृहरक्षक दल सतर्क
दीपावली सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना गर्दी उसळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील रेल्वेस्थानकात गृहरक्षक दलाचे जवान दिवस-रात्र ड्युटी बजावत आहेत. दोनच दिवसापूर्वी मडगाव-एलटीटी स्पेशलमध्ये चढत असताना पाय घसरल्याने खाली पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली.






