
Gokul Dudh Sangh Election Results, Gokul Dudh Sangh,
सुरुवातीच्या कलांनुसार, गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी आपल्या गनिमी काव्याने महायुतीला धक्का दिल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सर्वसाधारण गटासह पाच गटांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निकालापर्यंत चित्र स्पष्ट होईल.
खास बाब म्हणजे गोकुळची संपूर्ण निवडणूक जाहीर झाल्यापासूनच ही निवडणूक महायुती विरुद्ध सतेज पाटील अशा लढतीची चर्चा रंगली होती. पण महायुतीमध्ये जागावाटपापासून ते मतदारांना अंगारा-भंडारा देण्यासारख्या अनेक घडामोडी समोर आल्या. त्यामुळे दबावतंत्राचा वापर करूनही मतदारांनी प्रत्यक्ष मतदानातून महायुतीला धक्का दिला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे महायुतीने आपल्या मतदारांना थेट यल्लमाच्या परडीचा भंडारा लावून मतदारांना शपथ घ्यायला लावली होती, अशी चर्चाही कोल्हापुरच्या राजकारणात रंगली होती. माजी आमदार के. पी. पाटील यांनी शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होतो, असे असे वादग्रस्त विधान केल्याने राजकारणात चांगला वादही निर्माण झाला होता.
दुसरीकडे के. पी. पाटील यांनीही आपल्या भाषणादरम्यान, गोकुळच्या मागच्या निवडणुकीचा संदर्भ दिला होता. त्या वेळी सहा नेत्यांनी बाळूमामाची शपथ घेतली होती. पण दुसऱ्याची दिवशी त्यातील एका नेत्याने शपथ मोडल्याने त्याला ब्रेन स्ट्रोकही झाला, असा दावा पाटील यांनी केला होता. बाळूमामाच्या शपथेचा मोठा प्रभाव असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
Baramati News: उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; बारामती एमआयडीसीतील विमानतळवर नेमक काय
तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्याही शपथा घेतल्या नसल्याचे सांगितले होते. त्याला शपथ नव्हे तर आणाभाका म्हणतात, अशी भूमिका मुश्रीफांनी मांडली होती. गोकुळच्या मागील निवडणुकीत सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शपथा घेतल्या गेल्या होत्या, असा पलटवारही मुश्रीफ यांनी केला होता.
दरम्यान, सतेज पाटील यांनी के. पी. पाटील यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जातोय पण असेल, तर मतदार अशा धमक्यांना भीक घालणार नाहीत, असी टिकाही त्यांनी केली. तसेच, मागील निवडणुकीत शपथ घेतली होती, तर मग पाच वर्षे माझ्यासोबत का राहिला नाही, असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या घडामोडींनंतर गोकुळच्या मतमोजणीत क्रॉस व्होटिंगचा काय परिणाम दिसून येतो आणि त्याचा फायदा कोणाला होतो, हे अंतिम निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता कोणाच्या हातात जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.