द्रुतगती महामार्गावर बसचा भीषण अपघात
पिंपरी: कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसला अपघातानंतर अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २५) पहाटेच्या सुमारास घडली. ही घटना उर्से टोलनाक्याच्या पुढे, ओझर्डे गावाच्या हद्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घडली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते. सुदैवाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून निघालेली खासगी बस पहाटेच्या सुमारास वेगाने मुंबईच्या दिशेने जात होती. प्रवासी झोपेत असतानाच बस अचानक रस्ता सोडून बाजूच्या बॅरिगेटला धडकली. या अपघातामुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
प्रसंगावधान राखत चालक आणि वाहकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सावधगिरीने खाली उतरवलं. काही क्षणांतच बसच्या मागील भागातून धूर निघू लागला आणि पाहता पाहता संपूर्ण बसने पेट घेतला. काही प्रवाशांनी स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मदतीसाठी आरडाओरड केली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. आग भीषण स्वरूपात असल्याने तिला आटोक्यात आणण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तास लागला. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.
प्रशासनाची तत्परता
घटनेनंतर लगेचच द्रुतगती मार्ग पोलीस व शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक नियंत्रणात ठेवत मदत व बचावकार्य सुकर केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनीही स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची आहे. बसमधील चालकाने वेळेवर प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला,” अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली.
पुणे- मुंबई महामार्ग बनला मृत्यूचा सापळा