फोटो सौजन्य - Social Media
वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) कडून सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन ९० दिवस’ मोहिमेला वेग देण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत असलेल्या सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास २९ हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
अकोला परिमंडलात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा विविध वर्गवारीतील एकूण ३ लाख ५३ हजार ९२ ग्राहकांकडे १२४ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील १ लाख १९ हजार ५६३ ग्राहकांकडे ४५ कोटी २६ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ६२ हजार ८२३ ग्राहकांकडे ५७ कोटी १७ लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यातील ७९ हजार ७०६ ग्राहकांकडे २२ कोटी ०७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. थकबाकी वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून ‘मिशन ९० दिवस’ मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष ग्राहकांच्या भेटी घेऊन वीजबिल वसुलीसाठी प्रयत्न करत आहे.
या मोहिमेदरम्यान थकीत वीजबिलासाठी ४४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी २८ हजार ९१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ६ हजार ९१५ ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ९ कोटी ६४ लाख रुपये थकीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील १५ हजार ७८५ ग्राहकांचा वीजपुरवठा २८ कोटी ८७ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी खंडित करण्यात आला आहे. तर वाशिम जिल्ह्यातील ६ हजार २१४ ग्राहकांचा वीजपुरवठा ६ कोटी २० लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बंद करण्यात आला आहे.
ज्या गावांमध्ये वीजबिल भरण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, त्या ठिकाणी महावितरणकडून सामूहिक मोहीम राबवून थेट वीज मीटर काढून आणण्याची कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण यंत्रणा सहभागी होत आहे. मीटर काढून आणल्यानंतर संबंधित ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये आणि त्यांचा वेळ वाचावा, यासाठी महावितरणने ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यूपीआय, नेट बँकिंग, वॉलेट्स तसेच मोबाईलमधील फोनपे, गुगल पे यांसारख्या अॅप्सद्वारे किंवा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या वीजबिल भरता येते. तसेच वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट बिलाचा भरणा करता येतो. मुदतीत आणि ऑनलाइन पद्धतीने बिल भरल्यास जवळपास १.२५ टक्के सूटही दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे २१ दिवस शिल्लक असल्यामुळे वीजबिल वसुली मोहिमेला आणखी गती देण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल वसुली सुरू ठेवण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्रे आणि ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की, वीजपुरवठा खंडित होण्याची वाट न पाहता चालू महिन्याचे बिल आणि थकीत रक्कम वेळेत भरावी. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्यात आल्यास पुनर्जोडणीसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेज जोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. त्यामुळे अनावश्यक मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






