Illegal Cutting Of 400 Trees At Pimpalwadi Kolhapur Nrka
पिंपळवाडी येथे चारशे झाडांची बेकायदेशीर कत्तल
पिंपळवाडी (ता.राधानगरी) येथील साठवण तलावाच्या भिंतीवर असलेली सुमारे चारशे झाडांची बेकायदेशीर कतल करण्यात आली असून, पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या एका कारभाऱ्यानेच कायदा तलावात बुडवून झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यासाठी सहभागी झाल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.
भोगावती : पिंपळवाडी (ता.राधानगरी) येथील साठवण तलावाच्या भिंतीवर असलेली सुमारे चारशे झाडांची बेकायदेशीर कतल करण्यात आली असून, पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या एका कारभाऱ्यानेच कायदा तलावात बुडवून झाडे बेकायदेशीररित्या तोडण्यासाठी सहभागी झाल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कौलव ग्रामस्थांनी दिला आहे.
पिंपळवाडी येथे सुमारे सहा कोटी रुपये किमतीचा साठवण तलाव शासनाने पिंपळवाडी कौलव गावातील शेतकऱ्यासाठी बांधला आहे. जिरायती परिसरातील शेतकऱ्याना जनावरांना मुबलक पाणी व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, जमिनीतील भूजल पातळी वाढावी, या उद्देशाने साठवण तलाव बांधण्यात आला. अर्धा टीएमसी क्षमता असलेल्या हा तलाव पूर्ण क्षमतेने भरत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पिंपळवाडी येथील काही नागरिकांनी साठवण तलावाच्या भिंतीवरती असलेली चारशे ऑस्ट्रेलियन बाभळीची झाडे तोडून राधानगरी येथील एका ठेकेदाराच्या मदतीने झाडांची योग्य विल्हेवाट लावली. या झाडांची किंमत बाजारभावाने सुमारे सात लाख रुपये आहे. झाडे जलसंधारण विभागाच्या कार्यक्षेत्रात येत आहेत. झाडे तोडून पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप जलसंधारण विभागाला झाडे तोडल्याची माहिती समजली नाही.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता आम्हला काही माहिती नाही अशी उत्तरे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्यांच्याकडे शासनाच्या मालमत्तेची रक्षणाची जबाबदारी दिली आहे. त्यांना लाखो रुपयांची संपत्ती हडप झाल्याची माहिती मिळत नाही. यावरून शासनाचे काम म्हणजे ‘आंधळे दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशीच अवस्था आहे.
तलावाला बाधा आणण्याची दुसरी घटना
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी साठवण तलावातील मासेमारीसाठी रासायनिक स्फोटके टाकून तलावाला भेगा पाडण्याचे काम पिंपळवाडी येथील एका बहादराने केले होते. शासकीय अधिकारी येऊन त्याची चौकशी झाली. मात्र, त्याच्यावर कोणत्याही कारवाई न झाल्याने काळ सोकावत गेला आणि साडेचारशे झाडांची कत्तल करून शासनाची लाखो रुपयांची संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे परिसरातून बोलले जात आहे.
Web Title: Illegal cutting of 400 trees at pimpalwadi kolhapur nrka