इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण; प्रशांत कोरटकरांच्या घरासमोर सुरक्षा वाढवली
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. दरम्यान सावंतांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्या प्रशांत कोरटकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर यांच्यासोबत एका गनमॅन तैनात करण्यात आलाय. प्रशांत कोरकटर हे सध्या घरी नसल्याने गनमॅन त्यांच्यासोबत असणार आहे. इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांनी त्यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मात्र प्रशांत कोरटकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने सावंत यांना धमकीचा फोन आला. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली. धमकी आल्याची बातमी माध्यमात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.
कथित धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवलाय. कोल्हापूर पोलीस इंद्रजीत सावंत यांच्या घरी आले. पोलिसांनी धमकीचं कॉल रेकॉर्डिंगही ऐकलं त्यानंतर इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवलाय. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने धमकी आली होती, असे इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.
इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांच्यावर धमकीचे आरोप केल्यानंतर प्रशांत कोरकट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावलेत. यानंतर प्रशांत कोरटकर यांना धमकीचे फोन येत आहेत. आरोप केल्यानंतर अनेकांनी आपल्या फोनवरून धमक्या दिल्याचही साम टिव्हीशी बोलतांना म्हटलं होतं. माझा जीवाला कमी जास्त झालं तर यासाठी इतिहासकार इंद्रजित सावंत हेच जबाबदार असतील असेही प्रशांत कोरटकर म्हणालेत.
मला whatsapp कॉलद्वारे जी धमकी आलेली आहे. या संदर्भातील सर्व माहिती मी पोलिसांना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा समाजासंदर्भात जे आक्षेपार्ह विधान केली आहेत, या संदर्भातली मुख्य तक्रार माझी आहे. मला धमकी आणि मारहाण करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी तक्रार दिलेली नाही. समाजात द्वेष पसरवण्यासंदर्भात काहींचं कारस्थान सुरू आहे.
मी झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे, आता पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. पुरावा म्हणून मी जो मोबाईल क्रमांक, व्हाट्सअप नंबर आणि संभाषणाची क्लिप दिलेली आहे. त्याच्यावरून किमान पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे.