
कोल्हापुरात धक्कादायक प्रकार; अडीच कोटी दिल्यानंतरही पैशांची मागणी, दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
कोल्हापूर : खासगी सावकाराकडून घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या कर्जापोटी अभियंता महिलेने तब्बल अडीच कोटी रुपये दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. वसुलीसाठी गुंडांची भीती दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तसेच दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अभियंता गीता स्वप्नील मोरे (वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर; सध्या चिंतामणी पार्क, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर) यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिद्धेश मिलिंद गायकवाड (वय २४), अजिंक्य संभाजी जाधव (२५) आणि स्वाती सुनील सिन्नर (२३, सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता मोरे यांना व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी २९ सप्टेंबर २०२१ रोजी खासगी सावकार सिद्धेश गायकवाड याच्याकडून सहा लाख रुपये घेतले होते. या रकमेवर दरमहा १० टक्के व्याज देण्याचे ठरले होते. वेळेत मुद्दल आणि व्याजाची परतफेड न झाल्यास सहा लाखांच्या बदल्यात १२ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातल्याचा आरोप आहे. आर्थिक अडचणींमुळे मोरे यांना वेळेत परतफेड करता आली नाही. त्यानंतर गायकवाड याने १२ लाख रुपयांच्या वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पैशांची वसुली करण्यासाठी गायकवाड याने स्वप्नील जाधव, बल्ली भाई आणि अजित तिवडे यांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच गीता मोरे यांच्या आईसह अन्य नातेवाईकांना फोन करून पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याचदरम्यान त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सततच्या धमक्यांमुळे भीतीपोटी मोरे यांनी नातेवाईकांचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे उभे केले. वेळोवेळी सावकाराला रक्कम परत करण्यात आली. अखेर २ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी तब्बल २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरूच राहिल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर गीता मोरे यांनी पोलिसांत धाव घेतली.
फिर्यादीनुसार, गायकवाड याने स्टॅम्पवर नोटरी करून घेतल्यानंतर गीता मोरे यांचे सोन्याचे दागिने, चेक आणि एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कमही एटीएमच्या माध्यमातून परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय सोनाराकडे गहाण ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही परस्पर सोडवून घेतल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव आणि स्वाती सिन्नर यांच्यासह स्वप्नील जाधव (लाला शेठ), सरिता मिलिंद गायकवाड, तेजस चंद्रकांत माने, गायत्री अजिंक्य साळोखे-गायकवाड आणि अजिंक्य अशोक साळोखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.