राजू शेट्टींच्या आंदोलनाआधीच पोलिसांची नोटीस; किणी टोल नाक्यावर चक्काजाम केल्यास कारवाईचा इशारा
आज मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी पुणे-बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाका येथे समर्थक आणि कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही नोटीस बजावली. रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी ही कारवाईची नोटीस लागू केली.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या २७ ऑक्टोबर रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि ३७ (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशांचा आधार घेत पोलिसांनी शेट्टी यांना नोटीस दिली आहे.
नोटीसमध्ये आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मागण्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात, असेही पोलिसांनी बजावले आहे. आंदोलनादरम्यान शेट्टी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना सर्वस्वी जबाबदार धरले जाईल आणि नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
मात्र, पोलिसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतरही राजू शेट्टी यांनी आंदोलन करण्याचा निर्धार कायम ठेवल्याने आज ३ नोव्हेंबर रोजी किणी टोल नाक्यावर नेमके काय घडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






