...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘ज्या लाडक्या बहिणींनी नियम व अटीशर्तींचे पालन न करता अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडून आता दंडासह पैसे वसूल केले जाऊ शकतात, असे विधान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे श्रेय सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दिले होते. मात्र, आता सत्तेत येताच त्यांची भाषा बदलल्याचे दिसत आहे. छगन भुजबळ यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘ज्या लाडक्या बहिणींनी नियम व अटीशर्तींचे पालन न करता अर्ज भरले आहेत, त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल केले जाऊ शकतात. अशा बहिणींनी स्वतःचे नाव मागे घ्यावे, असे आवाहनही केले होते. भुजबळांच्या या विधानाने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे
कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. चारचाकी नसावी. एका घरातील दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र, त्याचा फायदा एकाच घरातील अनेक महिला घेत असल्याच्या तक्रारी सरकारकडे येत आहेत. तसेच वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत चुकीची माहिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
2.47 कोटी महिला लाभार्थी
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते. छाननीनंतर 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, आता अनेक महिलांनी विहित निकषांचे पालन न करता या योजनेसाठी अर्ज केले होते, अशा तक्रारी येत आहे. निवडणुकीपूर्वी या अर्जाची काटेकोरपणे छाननी झाली नसल्याचा आरोपही केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीच योजना
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी भुजबळांच्या वक्तव्यानंतर महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षांनी केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणल्याचे स्पष्ट झाले आहे. आता निवडणुका संपल्यानंतर भुजबळ सांगतात की, ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज केलेत, त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. या महिलांनी अर्ज केला त्यावेळीच आवश्यक ती चौकशी का झाली नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.