आयात? छे, ९० टक्के निष्ठावंत उमेदवारच विरोधकांच्या आरोपांवर संभाजी पाटील-निलंगेकरांचा पलटवार
काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लातूरमध्ये भाजपाने प्रामुख्याने जुने, प्रामाणिक कार्यकर्तेच उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत. दै. ‘नवराष्ट्र’शी बोलताना निलंगेकर म्हणाले की, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा ७० जागांवर लढत असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक उमेदवार हे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. केवळ सुमारे १२ प्रभागांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणे, सामाजिक समतोल आणि विजयाची शक्यता लक्षात घेऊन बदल करावे लागले आहेत. हे चित्र केवळ लातूरपुरते मर्यादित नसून राज्यातील २९ महानगरपालिकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागाचे राजकीय व सामाजिक वास्तव वेगळे असते.
निवडणूक रणधुमाळीला वेग ! नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप पक्षश्रेष्ठींच्या सभा
भाजपा कोणत्याही कार्यकर्त्याला केवळ निवडणुकीसाठी उभे करून पराभवाच्या दिशेने ढकलत नाही. यासाठीच योग्य आणि प्रभावी उमेदवाराची निवड केली जाते. विकासाच्या नेतृत्वावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून एखादा सक्षम व प्रभावशाली उमेदवार भाजपामध्ये येत असेल आणि त्यामुळे विजयाची शक्यता वाढत असेल, तर पक्षहितासाठी त्याला सोबत घेणे अपरिहार्य ठरते..
भावनांपेक्षा वास्तव आणि विजयाचे गणित भाजपासाठी महत्त्वाचे आहे. एखादा प्रभाग सामाजिक समीकरणांमुळे अडचणीत येत असेल, तर स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो, हीच पक्षाची भूमिका आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाकडे जवळपास ६५० इच्छुकांचे अर्ज आले होते. जागा एकच असल्याने सर्वांनाच संधी देणे शक्य नसते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र साडेसहाशे अजर्जापैकी केवळ चार-पाच जणांनीच उघड नाराजी व्यक्त केली असून, हजारो कार्यकर्ते उमेदवारी नसतानाही पक्षाचा उमेदवार जिंकवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. हा भाजपचा खरा चेहरा असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
उमेदवारी ठरवण्याची प्रक्रिया कोणत्याही एका नेत्याच्या हातात नाही. प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते आणि त्या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरच अंतिम उमेदवारी ठरते. लातूरमधील कोणताही आमदार एकट्याने निर्णय घेत नाही. एखाद्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अडचणी निर्माण होत असतील किंवा विजय धोक्यात येत असेल, तर बदल करणे पक्षहितासाठी आवश्यक ठरते, असे सांगत निलंगेकर यांनी उमेदवारी बदलाच्या निर्णयाचे समर्थन केले.






