लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव
लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम
प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव
लातूर : राज्यातील एसटीला मोठा फटका देणारी अवैध वाहतूक लातूर जिल्ह्यात अद्यापही बेधडक सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात एसटी आणि आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी आज (23 मार्च 2026) लातूर येथे एसटीच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली असताना त्या नंतर पत्रकारांशी बोलताना या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, लातूर, उदगीर, अहमदपूर आणि औसा येथून मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि संभाजीनगर या प्रमुख शहरांकडे मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहतूक सुरू आहे. यात अनेक अवैध छोटी वाहने तसेच परवानाधारक बसही नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करत आहेत.परवानगी नसताना टप्पे वाहतूक सुरू असल्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून राज्यभरातील सुमारे ३५ टक्के गाड्यांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. लातूर जिल्ह्यातही सुमारे २० टक्के वाहतूक अवैध प्रकारामुळे प्रभावित झाली असल्याचे बरगे यांनी नमूद केले.
अवैध वाहतूक रोखण्यासाठी एसटी व आरटीओ अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबवणे अत्यावश्यक असताना, १ मार्चपासून एकही संयुक्त कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे एसटीला पुन्हा उर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्नशील असताना त्यांच्या आदेशांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लातूर जिल्ह्यातील अवैध वाहतूक तात्काळ थांबवून नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही बरगे यांनी यावेळी केली.
दरम्यान, लातूर शहरात वाढत्या वाहनसंख्येमुळे प्रमुख चौकांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने पोलिस दलाने महानगरपालिका प्रशासन व इतर संबंधित विभागांच्या समन्वयाने वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.






