मुंबई: जरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने सिंहाची जोडी मुंबईला भेट दिल्यानंतर मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई विमानतळावर महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. आई मुंबादेवीची मूर्ती आणि जय श्रीरामचा स्कार्फ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मिश्रा यांनी गुजरात प्रशासनाचे आभार मानले असून, मुंबईला सिंह भेट दिल्याबद्दल महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही त्यांनी आभार मानले. आता पर्यटकांना बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्येही ३ वर्षांचा सिंह दिसणार आहे.
अमरजित मिश्रा म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे ढकलणाऱ्या मागील आघाडी सरकारमधील सर्वच नेते गुजरातला प्रत्येक गोष्टीत शिव्या देत राहतात. आता त्यांनी गुजरातने मुंबईला दिलेल्या या भेटीबद्दलही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी होती. देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक आणि इतर प्रकारच्या देवाणघेवाणीमुळेच भारताची एकता मजबूत होते असेही ते म्हणाले.
यावेळी माजी उपमहापौर अरुण देव, जिल्हा भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सरिता राजपुरे, वनिता गावंड, स्मिता भालेकर, राधा संचला, राकेश सिंग, मनोज सिंग व धीरेंद्र पांडे उपस्थित होते.