राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बाबत दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत.
महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी अनेक पुतळ्यांचे निर्माण केले आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. देशभरात त्यांनी अनेक शिल्प साकारली आहेत. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला आहे.
राम सुतार यांची अनेक शिल्पांमध्ये संस्कृतीचे दर्शन घडते. त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या शिल्पकलेत भारतीय संस्कृतीचा इतिहासाचा उत्तम मिलाफ दिसून येतो. राम सुतार यांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी, महाराजा रणजीत सिंग, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, यांचे पुतळे साकारले आहेत.
राम सुतार यांनी कांस्य, दगड आणि संगमरवरी दगडात अनेक पुतळे उभारले आहेत. राम सुतार यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा देखील साकारला आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हे सरदार सरोवरच्या जवळ बांधण्यात आलेले स्मारक आहे.