मुंबई महानगरातील सर्वात...धारावी पुनर्विकासाबाबत एकनाथ शिंदेंचे महत्वाचे विधान
धारावीचा चेहरा बदलण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, लवकरच धारावी हे आशियातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीची ओळख पुसून टाकत, धारावी आता सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृह येथे या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधत होते.
९५,७९० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारच्या २०% आणि अदानी समूहाच्या ८०% भागीदारीत राबवण्यात येणार आहे. केवळ निवासी वसाहतीपुरता मर्यादित न राहता, धारावीकरांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, धारावीचा पुनर्विकास हे केवळ स्वप्न नसून राज्य सरकारचे सामाजिक वचन आहे.
Maharashtra Monsoon: राज्यावर 48 तासांमध्ये येणार नवे संकट; IMD च्या ‘या’ हाय अलर्टने वाढवली चिंता
या प्रकल्पामुळे धारावीतील रहिवाशांना केवळ घर नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सलोख्याच्या सुविधा मिळणार आहेत. हा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरेल.
धारावीचे एकूण क्षेत्रफळ २५३ हेक्टर असून, त्यापैकी १७४ हेक्टर पुनर्विकासासाठी वापरण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प यांच्या समन्वयातून हे काम पार पाडले जाईल. एकूण ७२,००० युनिट्सचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यात ४९,८३२ निवासी आणि १२,४५८ औद्योगिक/व्यावसायिक युनिट्सचा समावेश आहे. या प्रकल्पाचा लाभ सुमारे ६ लाख धारावीकरांना मिळणार आहे.
या भागात शाळा, आरोग्य केंद्रे, पोलीस ठाणे, अग्निशमन केंद्रे, ग्रंथालये, बाजारपेठा अशा सुविधा ३८,००० चौ.मी.पेक्षा अधिक जागेत उभारण्यात येतील. मल्टी-मोडल ट्रान्सिट हब आणि मेट्रो लाईन ११ च्या थेट जोडणीसह, चालण्यायोग्य आणि स्मार्ट शहर म्हणून धारावीचा विकास केला जाणार आहे.
धारावीमध्ये मल्टी-मोडल ट्रान्सिट हब उभारण्यात येणार असून मेट्रो लाईन ११ ची थेट जोडणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. धारावीतील १०८.९९ हेक्टर जमिनीचा विकास यात करणार असून स्मार्ट आणि चालण्यायोग्य शहराची संकल्पना डोळ्यासमोर ठेवली आहे असे सांगून ते म्हणाले की, प्रत्येक नागरी सुविधेपर्यंत ५, १० व १५ मिनिटांच्या अंतरावर पोहोचता येईल अशी रचना असेल.
धारावीत मशिदी, मंदिरे, दर्गा, चर्चेस अशा २९६ धार्मिक स्थळांची नोंद असून पुनर्वसनासाठी माजी मुख्य न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून सर्व निर्णय धारावीकरांच्या सल्ल्यानुसार व कायद्यानुसार घेतले जाणार आहेत. डिजिटल ट्विन टेक्नॉलॉजी व टेनेट मॅनेजमेंट सिस्टमचा या पुनर्वसनात वापर केला जाणार असून तंत्रज्ञांच्या उपयोगामुळे अचूकता आणि पारदर्शकता येईल. ड्रोन व लिडारद्वारे घरटी सर्वेक्षण केले जात असून ७९,४५५ घरांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि प्रत्यक्ष दस्तऐवजीकरण सुरू झाल्याची माहितीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.