(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
जून आणि जुलै 2026 मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 23 कोटी 33 लाख 31 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 27 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील एकूण 17 हजार 245 शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. 11 हजार 207.79 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
विभागनिहाय विचार केला असता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील 9 हजार 683 शेतकऱ्यांसाठी 13 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील 6 हजार 885 बाधित शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 13 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील 661 शेतकऱ्यांसाठी 38 लाख 87 हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांसाठी 41 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई कोणत्याही जुन्या कर्जखात्यात किंवा वसुलीसाठी वळती करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. संबंधित बँकांनाही याबाबत कडक निर्देश देण्यास सांगण्यात आले आहे.
ही मदत DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. मदत वाटप करताना एकाच व्यक्तीला दोनदा लाभ मिळणार नाही, याची खबरदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि प्रत्येकाला मिळालेल्या मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच मदत वाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावरही सरकारने भर दिला आहे.






