'लाडकी बहीण'नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना... (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : 2024 मध्ये तत्कालीन शिंदे सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेचे मानधन सध्या 1500 रुपये दिले जात आहे. पण, आता देखील राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने 9 टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथे बैठक पार पडली. यामध्ये शासकीय महामंडळांच्या महिलांसाठीच्या व्याजपरतावा योजनांची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेशी घालण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि विविध महामंडळांमार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न करत आहे’.
दरम्यान, महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता 9 टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळांच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविला जाणार आहे.
वैयक्तिक आणि सामूहिक कर्जही मिळणार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून, त्यातून त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवली मदत मिळणार आहे. पर्यटन संचालनालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्यान्वित आहेत. या निर्णयामुळे महिलांना उद्यमशीलतेकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे.