मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ (फोटो- ट्विटर)
मुंबई: यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी महत्वाची योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात दरमहिन्यास १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान आता या योजनेबाबत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. आता १५ ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप यासाठी अर्ज भरलेले नाहीत, ते आता या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान राज्य सरकारने ५ महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. २ कोटी ३० लाख बहीणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार?
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे पैसे वाढवण्याबद्दल भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देत आहोत. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबील, युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहेत. कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पण या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर भविष्यात १५०० चे २००० , अडीच हजार नक्की करू, तेव्हा हात आखडता घेणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.