राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका शांततेत पार; ७२ टक्क्यांहून अधिक मतदान, मतमोजणीही निर्विघ्न
राज्यातील विविध नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या असून मतमोजणीची प्रक्रियाही कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पूर्ण झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगर परिषद आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर तिर्थपुरी नगरपंचायतीतील एका जागेसाठी कोणतेही नामनिर्देशन प्राप्त न झाल्याने ती जागा रिक्त राहिली. त्यामुळे उर्वरित ३८ जागांसाठी मतदान घेण्यात आले.
शनिवारी राज्यातील १० जिल्ह्यांतील ७ नगर परिषद आणि ७ नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी मतदान पार पडले. सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरासरी ७२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली, तर पोटनिवडणुकांमध्ये ७१.५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकांसाठी एकूण ४० हजार ८६९ मतदार पात्र होते. त्यामध्ये २० हजार ३५४ पुरुष आणि २० हजार ५१५ महिला मतदारांचा समावेश होता. सार्वत्रिक निवडणुकीत ११ हजार ८२१ पुरुष आणि १० हजार ८५३ महिला मतदारांनी मतदान केले. तर पोटनिवडणुकांमध्ये ३ हजार ३२४ पुरुष आणि ३ हजार ४१९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यभरात एकूण ५१ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. मतदानासाठी ५१ ईव्हीएम यंत्रे तसेच तितक्याच संख्येने बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला.
मतदानादरम्यान राज्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित घटना घडल्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले. सर्व मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, रविवारी २१ जून रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत निकाल जाहीर केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, “नगर परिषद आणि नगरपंचायतांच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व ठिकाणी प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली.”






