
Maharashtra Breaking News Today
01 Sep 2026 10:00 AM (IST)
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेल्या कथित मोठ्या घोळाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार याद्यांमधील विसंगती आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मतदार याद्यांच्या एसआयआर (SIR) प्रक्रियेतून समोर आलेल्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदी बाद झाल्याचा दावा केला.
01 Sep 2026 09:45 AM (IST)
Dr Rajendra Rupanwar Suicide case: साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. डॉ. रुपनवर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावरच सुसाईड नोट लिहून वरिष्ठांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने आणि कोंडे देशमुख यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांनी केली आहे. जोपर्यंत संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
01 Sep 2026 09:35 AM (IST)
Inflation in Mumbai: आज, १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे दरबदल लागू झाले आहेत. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत दूध, सीएनजी आणि रिक्षा-टॅक्सीचे भाडे महाग झाल्याने मुंबईकरांचा दैनंदिन खर्च वाढणार आहे. मुंबईत म्हशीच्या दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रति लिटर झाला आहे. ही दरवाढ १ सप्टेंबरपासून लागू झाली असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना यापेक्षा जास्त दर मोजावा लागणार आहे.
दुसरीकडे, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) १ सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले आहे. पहिल्या १.५ किमी प्रवासासाठी हे नवीन किमान दर लागू असतील. डिजिटल मीटरमध्ये नवीन दर सेट करण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्डचा वापर केला जाईल.
01 Sep 2026 09:27 AM (IST)
Duleep Trophy 2026: भारतीय क्रिकेटमधील १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या ‘दुलीप ट्रॉफी २०२६’ स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे तुफान चर्चेत आहे. या स्पर्धेत त्याला ईस्ट झोन संघाच्या उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात वैभवला बॅटने फारशी कमाल दाखवता आली नसली, तरी त्याने अप्रतिम गोलंदाजी करत २ महत्त्वाचे बळी टिपले. त्याची अनोखी गोलंदाजीची शैली (Bowling Action) पाहून क्रिकेट चाहत्यांसह माजी खेळाडूही चक्रावून गेले आहेत. भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही त्याच्या या बॉलिंग ॲक्शनवर दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
01 Sep 2026 09:19 AM (IST)
Mumbai Bandra Road Accident: मुंबईतील वांद्रे परिसरात रविवारी एका महिला चालकाने कारने चिरडल्याने आठ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत अंश गुप्ता या बालकाचा मृत्यू झाला असून तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघाताच्या या घटनेनंतर पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपी मेघा रावलच्या कुटुंबीयांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
01 Sep 2026 09:15 AM (IST)
मुंबई : महाराष्ट्रातील एसआयआर अर्थात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.३१) प्रसिद्ध करण्यात आली. जुन्या मतदार नोंदींमधील २ कोटींहून अधिक मतदारांचे नाव या यादीत नाही. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पुनरीक्षणापूर्वी राज्यात ९७८५४०४९ मतदार होते. यापैकी ७७१६५५६२ नावांचा मसुदा यादीत समावेश करण्यात आला आहे. वाचा सविस्तर-
01 Sep 2026 09:12 AM (IST)
India Share Market Update: १ सप्टेंबर रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, यांची सुरुवात सपाट ते नकारात्मक पातळीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा ५४ अंकांनी घसरून सुमारे २४,१९७.५ अंकांवर व्यवहार करत होता.
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ३०७.२४ अंकांनी, म्हणजेच ०.४० टक्क्यांनी घसरून ७६,९५७.२७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ९५.२५ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी घसरून २४,०८०.४० वर स्थिरावला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आरक्षण मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण ढगफुटी आणि महापुरातील मृतांचा आकडा २७० वर पोहोचला असून, बाधित भागांत आंतरराष्ट्रीय मदत व बचावकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज निफ्टी व सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण पाहायला मिळत असली तरी बँक निफ्टीने तेजी कायम ठेवली आहे. १ सप्टेंबरपासून देशात एलपीजी सिलिंडरचे दर, विमान इंधन (ATF) आणि तबेला दूध दरात वाढ यासह ५ महत्त्वाचे आर्थिक नियम लागू झाले आहेत.