पुणे : ‘‘महाआघाडीकडे विकासाची दृष्टी नसून, त्यांची अवस्था दिशाहिन झाली आहे. त्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही आणि नियतसुद्धा नाही ’’अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बाेलताना केली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते.
देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित
केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, पुण्यात आज जाे बदल दिसत आहे, ताे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारमुळे आहे. आम्हाला पुण्याला एक उत्तम शहर बनवायचे आहे. देशातले टेक्नॉलॉजीचे शहर म्हणून विकसित करायचे आहे. जो काही विकास दिसतोय तो आमच्या काळातील आहे’’, असे फडणवीस म्हणाले.
मतदारांचा महायुतीवर विश्वास
पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून, गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला असल्याचा दावा करीत फडणवीस म्हणाले, ‘‘गिरीश बापट यांनी शहरात चांगले काम केले. आता मुरलीधर मोहोळ यांच्यासारखा तरुण तडफदार आणि यशस्वी महापौर आम्ही उमेदवार म्हणून दिला आहे. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. जनता मोदींच्या पाठीशी असून, राज्यात महायुतीच्या मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील.’’