फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा 'सस्पेन्स': केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी?
अधिकृत माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली होती. या दौऱ्यात फडणवीस यांनी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Nabin) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. २० जानेवारी २०२६ रोजी नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारला होता, तेव्हा फडणवीस दावोस दौऱ्यावर असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे ही एक सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.
‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान
दरम्यान, चार दिवसांपूर्वी फडणवीस यांनी कोणालाही माहिती न देता दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. ही भेट पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर (२८ जानेवारी २०२६) महाराष्ट्रात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, फडणवीस यांचे दिल्लीतील वाढते दौरे आगामी मोठ्या राजकीय बदलांचे संकेत मानले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि महायुतीमधील जागावाटपाबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंड दौऱ्यावर असताना नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर फडणवीस यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. पण फडणवीस यांचा हा दौरा गुप्त मानला जात होता. त्यावेळीही नितीन नवीन हे बिहारच्या दौऱ्यावर असल्याने दोघांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी कालच्या दौऱ्यात आवर्जून नितीन नवीन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पण नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले. त्यामुळेही या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Politics news)
बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील
महत्त्वाची बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले तर राजकीय समीकरणे पुन्हा बदलू शकतात. त्यामुळे फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, फडणवीस हे उगाच दोनदा दिल्लीला जाणारे नेते नाहीत. जेव्हा जेव्हा असे दौरे वाढतात, तेव्हा महाराष्ट्रात काहीतरी मोठे ‘राजकीय स्थित्यंतर’ घडते, असा आजवरचा अनुभव आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांचीही लवकरच दिल्लीत अमित शाह यांच्याशी भेट होण्याची शक्यता असल्याने, पुढचे ७२ तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.






