Photo : Kolhapur Event
कोल्हापूर : आधुनिक बदलत्या तंत्रज्ञानाची जोड देत, तरुणांना सहकाराशी जोडल्यास सहकाराचा उत्कर्ष वाढेल, असे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. महाराष्ट्र, गुजरात यासह अन्य राज्यात सहकाराची मुळे खोलवर रुजली आहेत. देशातील विकासात सहकाराचे मोठे योगदान असून, शासनाने देखील सहकार वाढावा यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे यापुढील काळात सहकारात बदलत जाणारे तंत्रज्ञान वापरावे तसेच प्रोफेशनल पद्धतीने या सहकारात काम चालवण्याची गरज राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.
हेदेखील वाचा : आता मुंबई ते इंदूर प्रवास होणार अधिक जलद, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी
वारणेत 50 वर्षांपूर्वी महिलांच्या विकासाचा प्रारंभ करणारे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी सहकारात आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा समृद्ध वारसा विनय कोरे व त्यांचे कुंटुबीय सहकारी चालवत आहेत. सहकार समूह हे विकासाचे केंद्र आहे. त्यामध्ये महिलांसह सर्वांचा विकास साधला जातो. त्यामुळे सहकार वाढला पाहिजे. वारणेने लिजंत पापड, वारणा दूध असे ब्रॅन्ड बाजारात आणले अनेक संस्थात महिलांचा उल्लेखनीय सहभाग ठेवला आहे. त्यामुळे महिला विकासात वारणा देशातीत एक आदर्श उदाहरण आहे असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.
प्रारंभी वारणा समुहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्वागत करून वारणेच्या स्थापनेपासून आजअखेर झालेला विकास तसेच महिला विकासासाठी सुरू असलेले उपक्रम याची माहिती दिली. राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहिणांना साद घालत सुरू केलेल्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी वारणा समूह सहकारातील आदर्श मानदंड आहे.
महिलांच्या विकासात वारणेचे योगदान सर्वाधिक आहे. या वारणा समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, यासाठी महाराष्ट्र शासन केंद्राकडे प्रस्ताव सादर करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शिवराज्याभिषेकाचे तैलचित्र भेट
सावित्री महिला औद्यौगिक संस्थेच्या आणि महिला समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते राष्ट्रपती मुर्मू , केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा सत्कार करण्यात आला. तर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.