तीन किडनीपीडित चंद्रपुरात
चंद्रपूर : शेतकरी किडनी विक्रीप्रकरणात पोलिस आरोपींचा शोध घेत असताना उत्तर भारतातील तीन किडनी पीडित थेट चंद्रपुरात पोहोचले. तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्येच त्यांचीही किडनी काढण्यात आल्याची आपबिती त्यांनी चंद्रपूर पोलिसांना सांगितली. आता किडनी पीडितांची संख्या पाच झाली आहे.
अंकुल शर्मा (रा. भिंड, मध्य प्रदेश), नवीन साहू (रा. दिल्ली) आणि जावेद (रा. मुज्जफरनगर, उत्तर प्रदेश) अशी पीडितांची नावे आहेत. यापूर्वी याच रुग्णालयात किडनी विक्रीतील एजंट हिमांशू भारद्वाज तसेच उत्तर प्रदेशातील पीडित मोहम्मद तारीक खान यांचीही किडनी काढल्याचे समोर आले होते. या पाचही जणांचे जबाब चंद्रपूर पोलिसांनी नोंदविले आहेत. अंकुल आयपीएलमध्ये हरला. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. तर नवीनच्या आईला कॅन्सर झाल्याने त्याला उपचारासाठी पैसे हवे होते.
हेदेखील वाचा : Chandrapur Kidney Racket : किडनी प्रकरणातील मोठी माहिती लवकरच समोर? आरोपीच्या शोधासाठी पोलिस कोलकात्यात
दरम्यान, जावेद कपड्याच्या दुकानात नोकर होता. तिघांनी आर्थिक चणचण दूर करण्यासाठी किडनी विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सुरवातीला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले. पण प्रत्यक्षात तिघांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले. उरलेल्या 10 लाख रुपयांसाठी तिघांनी अनेक वेळा त्रिची गाठली. पैसे मिळत नसल्याने पोलिसांकडे धाव घेतली. तिथेही अपयश आल्याने त्यांनी तामिळनाडूतील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना तक्रार दिली. त्यांनी तिघांचे व्हिडिओ बनवून घेतले. पण इथेही त्यांच्या हाती काही लागले नाही.
गोविंदस्वामी अद्यापही पसारच
डॉ. राजरत्न गोविंदस्वामी याचे नाव तपासात समोर आल्यानंतर तो पसार झाला आहे. त्याने ५ जानेवारी रोजी मथुराई न्यायालयात ट्रान्झिट बेलसाठी अर्ज केला होता. त्याला ५ फेब्रुवारीपर्यंत ट्रान्झिट बेल देण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याला अटकपूर्व जामीन चंद्रपूर न्यायालयातून मिळवावा लागणार असल्याने पोलिस त्याच्या पाळतीवर आहे.
ब्रह्मपुरीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
दुसरीकडे, ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली. किडनी विक्री प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुब्रोजित पॉलचा शोध घेण्यासाठी कोलकाता शहर पालथे घातले. त्यानुसार, आता पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.






