किडनी प्रकरणातील मोठी माहिती लवकरच येणार समोर? आरोपीच्या शोधासाठी पोलिस कोलकात्यात
कोलकाता : शेतनागभीड तालुक्यातील सावकारी कर्जची परतफेड करण्यासाठी किडनी विकल्याचे प्रकरण उघडकीस आले. हे प्रकरण समोर येताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात सहा सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. तर या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली. किडनी विक्री प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुब्रोजित पॉलचा शोध घेण्यासाठी कोलकाता शहर पालथे घातले. परंतु तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.
पोलिस कोठडीत असलेल्या रामकृष्ण सुंचू आणि हिमांशू भारद्वाज यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांचे पथक कोलकाता येथे तळ ठोकून आहे. आरोपी सुब्रोजित हा रामकृष्ण आणि हिमांशूचा सहकारी आहे. हे तिघेही सोशल मीडियाचा वापर करून गरीब आणि असहाय्य लोकांना फसवित होते. पैशाचे आमिष देत त्यांना किडनी विकण्यासाठी तयार करत होते. आरोपी रामकृष्ण आणि हिमांशूच्या कॉल डिटेल्सची तपासणी पोलिस करत आहेत. या सीडीआरमुळे त्यांना या प्रकरणातील इतर आरोपींची माहिती मिळत आहे.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! सावकारी तगाद्यापायी शेतकऱ्याने विकली किडनी; एक लाखाचे कर्ज गेले 74 लाखांवर
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक सायबर टीम देखील काम करत आहे. ही टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. आरोपी हिमांशूच्या पीसीआरची मुदत संपल्यानंतर, शुक्रवारी संध्याकाळी त्याला पुन्हा ब्रह्मपुरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे.
तीन आरोपी पोलिस कोठडी तर ५ न्यायालयीन कोठडीत
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यापैकी मानवी अवयव तस्करीच्या आरोपाखाली दोन आरोपी पोलिस कोठडीत आहेत. बेकायदेशीर सावकारीचा आरोपी मनीष घाटबांधे देखील पोलिस कोठडीत आहे. बेकायदेशीर सावकारीच्या आरोपाखाली इतर पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर…
शेतकऱ्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतात. शेतीसाठी बँका अथवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले जाते. मात्र, त्याची परतफेड करता आली नाहीतर अनेक अडचणी येतात. अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्याने चक्क स्वत:ची किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे घडला. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर पोहोचले असून, किडनी विकूनही कर्जाची परतफेड मात्र झाली नसल्याचेही उघडकीस आले आहे.






