Photo Credit- Social Media
सिंधुदुर्ग : राज्यात सध्या अडीच कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. प्रत्येक महिलेच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महिलांना २१०० रूपये देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. पण महिलांना सरसकट पैसे दिल्याने राज्याच्या तिजोरीवर भार येत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने या योजनेचे निकष अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना ही आर्थिक मदत मिळणार नाही, यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिलांनी भेट घेत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहिण योजनेंतर्गत दरमहा ₹२१०० देण्याचे आश्वासन महायुती सरकारने पूर्ण न केल्याचा आरोप उबाठा शिवसेना महिला संघटनेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात उबाठा शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक श्रेया परब यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळावे आणि महिलांना दरमहा ₹२१०० चा निधी त्वरित मिळावा, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त सवाल
लाडकी बहिण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२,५०,००० पेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली. निवडणुकीदरम्यान हे मानधन ₹१५०० वरून ₹२१०० करण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यांपासून महिलांच्या खात्यात ₹१५०० देखील जमा झालेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
शासनाने वेगवेगळ्या निकषांच्या माध्यमातून या योजनेतील पात्र महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचीही टीका महिला संघटनेकडून करण्यात आली. गोरगरीब, कष्टकरी महिला या प्रक्रियेत अन्यायकारकपणे वगळल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद आहे. यावेळी जिल्हा महिला संघटक श्रेया परब, युवती सेना जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी सरपंच मंगल ओरोसकर, मालवण तालुका युवती सेना प्रमुख दीपा शिंदे, उपतालुका प्रमुख पूर्वा ओरोसकर, शहर युवती सेना प्रमुख हिना कांदळगावकर, उपशहर प्रमुख युवती सेना पाचल आढाव आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी आणि ₹२१०० अनुदानाची तरतूद करून ते निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करावे, अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
Nagpur Violence: ‘दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल’, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती