कृष्णा लावंड, अकलुज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशी लढत झाली. या लढतीत मोहिते पाटलांनी पुरस्कृत केलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तमराव जानकर हे सुमारे साडेतेरा हजार मतांनी विजयी झाले.
माळशिरस तालुका म्हटले की”, मोहिते पाटील हे समीकरण ठरलेले आहे. पण या निवडणुकीत याला छेद गेला आहे. भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती. राम सातपुते यांच्या विरोधात राजकीय क्षेत्रातील मातब्बर घराणे आणि मोहिते पाटील म्हणतील ती पूर्व दिशा असणारे हे होते. तसेच मोहिते पाटलांचे पारंपारिक राजकीय विरोधक उत्तमराव जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली . जानकर आणि मोहिते पाटील यांची राजकीय युती झाल्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळणार का? हि निवडणुक एकतर्फी होईल चर्चा सुरू झाली होती.
विद्यमान आमदार राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून त्यांनी आपल्या विकास कामाच्या जोरावर येथील सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना एकत्र येऊनही २५ पैकी १७ फेऱ्यापर्यंत चांगलीच झुंज देऊन साडेआठ हजार पर्यंत मतांची आघाडी घेतली होती. पश्चिम भागात राम सातपुते यांना प्रत्येक गावात बहुमत मिळाले . मात्र मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यापासून म्हणजे अकलूज पासून हे मताधिक्य कमी होत होत जानकर सुमारे साडेतेरा हजार मतांनी विजयी झाले आहेत.
# प्रारंभी एकतर्फी होणार असे वाटणारी ही निवडणूक राम सातपुते यांनी अतिशय चुरशीने लढली.
अतिशय कमी कार्यकर्ते, कुठलीही सहकारी संस्था नाही, कोणाचेही आर्थिक पाठबळ नाही. मात्र, आपल्या विकास कामाच्या जोरावर आणि विशेष म्हणजे त्यांनी राबवलेली आरोग्य दूत योजना या योजनेमधून तालुक्यातील सुमारे ४ हजार कुटुंबातील सदस्यांना पुणे, मुंबई सारख्या ठिकाणच्या नामांकित रुग्णालयात लाखो रुपयाची ऑपरेशन्स, वैद्यकीय मदत मिळालेली आहे. तसेच, सातपुते यांनी जात, धर्म, पक्ष न पाहता प्रत्येकाला मदत केली आहे. प्रत्येक गावात कमीत कमी दोन कोटीचा निधी दिला आहे. याशिवाय राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना, एसटीत ५० टक्के सवलत, शेतीपंपाचे शंभर टक्के वीज बिल माफ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी तळागाळापर्यंत भाजपला मतदान करण्यासाठी थेट केला प्रचार आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतृत्व हिंदुत्ववादी विरोधी भूमिका घेत आहेत. मुस्लिमांना कळत नकळत मदत करीत आहे. अशी भावना जनमानसात तयार झाली. या सर्वांचा परिणाम म्हणजे लोकांनी विशेषतः तरुणांनी आणि महिलांनी भाजपला भरभरून मतदान केले आहे.
1. लाडकी बहिण योजने मुळे विधानसभेच्या या निवडणुकीत मिळालेल्या मतामुळे भाजपला चांगले भवितव्य असल्याचे दिसून येते. याउलट सत्ताधारी मोहिते पाटील गटाला आत्मपरीक्षण करून आपल्या गटाची पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे दिसते.
2. माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, वेळापूर या शहरांमध्ये मोजणीच्या आदल्या दिवशीच उत्तमराव जानकर यांच्या हार्दिक अभिनंदनाचे डिजिटल फलक मोठ्या प्रमाणात चौका चौकात लागलेले दिसून येतात. उत्तम जानकर यांचे मताधिक्य वाढल्याचे लक्षात येताच अकलूज शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात जानकर समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजी सुरू केली आहे.
3. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचा, हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या प्रचाराचा, वैयक्तिक संपर्काचा, केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी चांगली लढत दिलेली दिसून येते.
4. नूतन आमदार उत्तमराव जानकर यांनी पाहिलेले आमदार पदांचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. या विजयामुळे तालुक्यातील धनगर समाजाला प्रथमच आमदार पदांची संधी मिळाली आहे.
5. पावणे चार वाजता उत्तम जानकर यांचा मतमोजणी केंद्रावर प्रवेश झाला.समर्थकांनी गुलालाची उधळण सुरू केली आहे.फटाक्याची आतषबाजी सुरू केली.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा 13 हजार 147 मताने विजय झाला आहे. उत्तमराव जानकर यांना मिळालेली मते 1,20322 तर पोस्टल मते 1391 मते अशी एकूण मिळून 1,21, 713 इतकी मते पडली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार राम सातपुते यांना 1,08 057 मते मिळाली. त्यात 57 मते ही पोस्टल मते होती. ही सर्व मिळून एकूण 1,08, 566 मते पडली. निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा पराभव झाला. सातपुते यांच्या पराभवातही एक वेगळी शान दिसून येते कारण तालुक्यातील दोन मातब्बर गट राम सातपुते यांच्या विरोधात एकत्र येऊन लढत होते.हे या निवडणुकीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल.
Web Title: Malshiras election news uttamrao jankar won the field defeating ram satpute nras