Manda Mhatre: 'माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही....' आमदार मंदा म्हात्रेंचं विधान
सिद्धेश प्रधान
नवी मुंबई : डॉ. राजेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्यावर मला मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष बांवनकुळे यांनी माहिती दिली. मी तातडीने राजेश पाटलांना फोन केला. त्यांना सांगितले की, आधी गणेश नाईकांना भेटा , त्यांचे मार्गदर्शन घ्या. ते मंत्री आहेत. मग आपण भेटू. गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत. माझे आणि त्यांचे थेट वाद अजिबात नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वाद होत आहेत, असं विधान आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं आहे. जुईनगर येथील डॉ. राजेश पाटील यांच्या पदग्रहण सभेत त्या बोलत होत्या. आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या विधानामुळे आता पुन्हा नवा पेच निर्माण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचं कारण म्हणजे आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांबाबत मोठं विधान केलं आहे.
जुईनगर येथील डॉ. राजेश पाटील यांच्या पदग्रहण सभेत बोलत असताना आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितलं केला आहे की, माझा गणेश नाईकांशी वैयक्तिक वाद नाही. माझे आणि त्यांचे थेट वाद अजिबात नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्यात वाद होत आहेत. हे कार्यकर्ते त्यांचे काम भरत असतात.
आमदार मंदा म्हात्रे पुढे म्हणाल्या की, गणेश नाईक हे माझ्या आधीपासून राजकारणात आले आहेत. ते मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर मी राजकारणात आलेली आहे. त्यांच्यासोबत मी काम केलेले आहे. खांद्याला खांदा लावत पक्ष उभारणीसाठी झटले आहे. १९९९ साली त्यांच्या निवडणुकीसाठी मी त्यांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे. मी त्यांना नेताच मानते. मात्र कार्यकर्त्यांना वाटते की, मी त्यांना नेते मानत नाही. नेते हे नेतेच असतात. मी महापौर निवडणूक देखील लढलेली होती. राज्यात अनेक पदे भूषविलेली आहेत. ३५ वर्षांचा दांडगा अनुभव माझ्याकडे आहे.
यावेळी बोलताना मंदा म्हात्रे यांनी संदिप नाईक यांच्याविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, माजी अध्यक्षांच्या काळात देखील त्यांना सहकार्य करण्याची भूमिका होती. त्यांनी जिल्हा कार्यकारिणीत त्यांची माणसे नियुक्त केली. तरीही आम्ही सहकार्य केले. अपक्षाने दिलेले कार्यक्रम राबवले. माजी अध्यक्षांना मी सांगितले होते, की तुम्ही पक्षांतर करू नका. आपण तरुण आहात आपल्याला या पक्षात भविष्य आहे. मात्र त्यांनी ऐकले नाही असे म्हणत मंदा म्हात्रे यांनी संदिप नाईकांबद्दल गौप्यस्फोट केला.