सातारा : सातारा जिल्ह्यात २५ लाख ७३ हजार ३० मतदार असून, या मतदारांचा निवडणूक ओळखपत्र व आधार कार्डाचा लिंकिंग कार्यक्रम एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यासाठी मतदारांनी छापील नमुना अर्ज नंबर ६ भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले. या कार्यक्रमासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ देण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण आठ मतदारसंघ असून, जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या २९८० आहे. यामध्ये पुरुष मतदार १३ लाख १६ हजार २१६, स्त्री मतदार १२ लाख ५६ हजार ७५२, तृतीयपंथी ६२, सैनिक मतदार १२९८३ व दिव्यांग मतदार १५ हजार ४१६ असे एकूण २५ लाख ७३ हजार तीस आहे. मतदारांनी मतदारांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे यासाठी आधार क्रमांक व मतदार ओळखपत्र हे लिंक करण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात एक ऑगस्ट २०२२ पासून सुरू झालेला आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक करण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक सहा तयार करण्यात आला आहे.
ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. http://www.nvsp.in/ या संकेत स्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. मतदारांनी नमुना अर्ज क्रमांक सहा भरून ऑफलाइन पद्धतीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावा, एक जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुननिर्रीक्षण कार्यक्रम घेतला आहे. त्यात वर्षातील १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या मतदारांना मतदार यादी मध्ये नाव नोंदवता येणार आहे. या ऑनलाईन अॅप मध्ये १७ वर्ष पूर्ण करून अठरा वर्षात पदार्पण करणाऱ्या तरुण मतदारांना फ्युचर क्लेम नावाचे नवीन ऑप्शन देण्यात आला आहे. हा लिंकिंग कार्यक्रम ३१ मार्च २०२३ पर्यंत चालणार आहे.
[read_also content=”पालिकेद्वारे पाळीव प्राण्यांसाठी मिळणार ऑनलाईन परवाना; आयुक्त राजेश पाटील यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/online-pet-license-issued-by-municipality-information-of-commissioner-rajesh-patil-nrdm-312108/”]
मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी मनरेगा जॉब कार्ड, बँक पासबुक, आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, चालक परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, फोटोसहीत पेन्शन कागदपत्र, ओळख पत्र, संसद सदस्यांनी जाहीर केलेल्या ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय जारी केलेले विशेष ओळखपत्र यापैकी कोणत्याही एका कागदपत्राची आवश्यकता आहे.