Photo Credit- Social Media
जालना : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्याही अडचणीत आणखी भर पडली आहे. बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे बीड परळीसह इतर गावात हे प्रकरण अधिकच तापले आहे.
याप्रकरणी विरोधकही आक्रमक झाले आहेत. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट नाव घेत धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा नेता असून, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पुढे म्हणाले, याप्रकरणी न्यायदेवता न्याय करणार आहे. मात्र, आरोपी वाचवा म्हणून काही नेत्यांनी फोन केला असणार. परंतु, हे सर्व आरोपी आणि पाठबळ पुरवणारे सर्व चार्जशीटमध्ये आले पाहिजे. धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे’, असेही जरांगे म्हणाले.
तसेच अंडर ट्रायल केस झाली पाहिजे. जातिवाद आणि दंगली घडवून आणणारी प्रचंड मोठी टोळी धनंजय मुंडे यांची आहे. धनंजय मुंडे यांना आजवर देशमुख कुटुंबाला भेटायला वेळ मिळाला नाही. मात्र, कराड कुटुंबीयांची भेट घेतली. यावरून या हत्याकांडात मुंडेंचाही सहभाग असावा, अशी शंका येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा
जरांगे पुढे म्हणाले, वाल्मिक कराडने पडद्याआड राहून धनंजय मुंडेंसाठीच माया जमवली आहे. ही जातीयवादी पसरवणारी टोळी असून ते माजलेले आहे. मात्र, यांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही. न्यायालय समोर आज आंदोलन सुरू आहे. कुठे गेली तुमची संचारबंदी? ते जवळ करायच्या लायकीचे आहेत का? त्यांना सामाजिक सलोखा ठेवायचा नाही? आरोपींना हे साथ कसे देऊ शकतात?. धनंजय मुंडे टोळीच्या जीवावर जातीला बदनाम करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. या सर्वांची नार्को टेस्ट करा आणि मोक्का व 302 लावून यांचे अंडरट्रायल चालवा, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
कराडच्या पत्नीने जरांगेंना सुनावले
मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात, ते आधी सिद्ध करा. आमच्या महाराजांनी असा जातीयवाद करण्यास शिकवले नाही, अशा शब्दांत खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराड यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाल्मिकला अडकवण्यात येत असल्याचा आरोपही मंजली यांनी केला आहे.