फोटो - टीम नवराष्ट्र
मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला हा पुतळा कोसळल्यामुळे राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. हा पुतळा नौदलाकडून बसवण्यात आला होता आणि याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मालवणचा दौरा केला आहे. राजकोट किल्ल्यावर जरांगे पाटील यांनी पाहणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी थेट खासदार नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दौरा करत आहेत.
राजकोट किल्ल्याची पाहणी
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरसभेमध्ये माफी देखील मागितली. मात्र ही राजकीय माफी असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन काढले आहे. मुंबईमध्ये त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तर या राजकोट किल्ल्याच्या घटनास्थळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील दाखल झाले आहेत. त्यांनी राजकोट किल्ल्याची आणि पुतळ्याची पाहणी केली. तसेच कार्यकर्ते व समर्थक यांच्यासोबत संवाद देखील साधला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव किल्ल्यावर दाखल झाले होते.
काय म्हणाले जरांगे पाटील?
यावेळी राजकोट किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरुन आणि पुतळा कोसळल्यामुळे राजकारण सुरु असल्याची खंत जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. या लोकांना जनताच धडा शिकवेल. थोडे दिवस थांबा. राज्यातील सर्व जनता यांच्या विरोधात जाणार आहे, तसेच या घटनेवरुन आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या, असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच राजकोट घटनेतील आरोपी पळून कसा काय जाऊ शकतो? त्याला धरुन आणा. यामध्ये हा पुतळा तातडीने उभारण्यामागे कोणाकोणाचा हात आहे, याचा शोध लागला पाहिजे, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.