मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय धोरण ठरविले होते. त्यानुसार, पीएमश्री योजना राबविली जाणार आहे. त्यामध्ये शाळांचे धोरण ठरविणारे आणि आदर्श असणारे शिक्षक यामध्ये इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय शाळांव्यतिरिक्त आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ वढू बुद्रुक यांचा समग्र विकासाबाबत आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या दोन्ही ठिकाणच्या कामांसाठी तत्काळ निविदा जारी करून 14 मे पूर्वी कामाला प्रारंभ होईल. यादिशेने संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच पीएमश्री या योजनेंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधुनिक सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत.
याशिवाय, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साक्षरता वाढवणं, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना या योजनेअंतर्गत सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल. खंडेरायाची जेजुरी विकास आराखडा, सेवाग्राम विकास आराखड्यासंदर्भात सुद्धा आज सविस्तर सादरीकरण या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले.
राज्यातील शाळांचे सक्षमीकरण होणार
राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरीही देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकारसह केंद्रशासित प्रदेश, स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही सहभाग घेता येणार असून, महाराष्ट्रात त्याबाबतचा निर्णय झाला आहे. पीएमश्री योजना राज्यात राबविण्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे.
आणखी निर्णय कोणते?
– पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देण्यात येणार आहे. सुमारे 787 कोटी खर्चास मान्यता दिली आहे. यामुळे 7690 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
– पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण.
– छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा.
– जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.
– महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.