जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणार आहे. याबाबत विधीमंडळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घोषणा केली. भाजप नेत्यांच्या मागणीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी ही मागणी केली. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून आता होऊन जाऊ दे असे आव्हान दिले आहे.
देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करत आहेत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर विधीमंडळामध्ये त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सत्तेचे वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणत्याही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाही. मला सर्वात जास्त फोन तुमचे आले आहे. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुट्टी नाही. 600 अधिकारी जातील. ज्या मंत्र्यांने आदेश दिले ते जातील. आम्ही आधी 50 वर्षे तुम्हालाच मोठे करण्यात घालवली ना. मी निर्भिड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.” अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यांकडून षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे मीच त्यांच्या घरी जाणार होतो. आता संपूर्ण समाज त्यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. दगडफेक हे त्याचे कामच आहे. जे आरोप करत आहेत त्यांनीच दगडफेक करण्यासाठी पाठवले आहे. गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ काढत होते. ती शूटिंग पण आणा, हे पण मी सांगतो. त्या ठिकाणी हजार जण आले आणि हाणायला सुरू केली. मला अटक केली तरी मी तयार आहे. मी फाशीवर जायला भीत नाही. जातीसाठी मरण येईल. फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल,’ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली असून ते फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहेत.