Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला अडवून त्याच्या चालकावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चालकास कन्नड येत नसल्यामुळे त्याच्या तोंडाला काळा फासण्यात आले. या वादामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बसेस बंद करण्याचे आदेश दिले. या हल्ल्याप्रकरणी कर्नाटकात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 Feb 2025 05:01 PM (IST)
गावठाण, गायरान इत्यादी जागेचा तिढा सोडवून पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा असे निर्देश माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील गटविकास अधिकऱ्यांना दिले आहेत राज्यातील बेघरांना घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा - 3 मध्ये एकही पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी असे देखील आ. अब्दुल सत्तार म्हणाले आहेत
23 Feb 2025 04:40 PM (IST)
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराइताला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. गुलटेकडी येथे ही कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. ओंकार बाळू मावस (वय २१, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
23 Feb 2025 04:06 PM (IST)
हमाल मापाडी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे हमाल मापाडी कामगार आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. पिंपळनेर सामोडे चौफुलीवर या हमाल-मापाडी कामगारांनी सुरत बायपास हायवे रोखून धरत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले आहे. या रास्ता रोको दरम्यान वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे दिसून आले असून, जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघावयास मिळाले आहे, यावेळी या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने हमाल मापाडी कामगार सहभागी झाले. त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
23 Feb 2025 03:42 PM (IST)
प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला आहे.
23 Feb 2025 03:20 PM (IST)
नागपूरमध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आज दुबई मध्ये खेळला जाणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा चॅम्पियन ट्रॉफी चा सामना अतिशय रंगतदार ठरणार आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर मध्ये होम हवन करण्यात आला आहे.
यासाठी नागपूरच्या खामला चौकातील हनुमान मंदिरात हवन करून टीम इंडिया जिंकण्यासाठी बजरंगबलीला साकडे घालण्यात येत आहे. सामन्यात भारताचा विजय व्हावा यासाठी खामला येथील हनुमान मंदिरात पूजा पाठ देखील करण्यात आला आहे. यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा सह इतर भारतीय खेळाडूंचे फोटो घेवून क्रिकेट समर्थक बसले पूजेला बसले आहे
23 Feb 2025 02:51 PM (IST)
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. २०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही, असा गंभीर आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे.
23 Feb 2025 01:31 PM (IST)
मुंबई परिसरात घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. म्हाडाकडे कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका आणि भूखंड विक्रीकरिता सुमारे २४, ९२२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले होते. ही सोडत निघाली त्यात अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतु आता म्हाडाने नवीन घरांची योजना आखली आहे
23 Feb 2025 01:07 PM (IST)
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) मुंबईत एसी आणि नॉन-एसी बसेसचे भाडे वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल आणि सध्या त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बेस्टचे नवे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात सर्व बस सेवा आणि भाडेवाढीच्या मुद्द्यासह प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला.
23 Feb 2025 12:14 PM (IST)
"दोन दिवसांपूर्वी शिवजंयती होती. यानिमित्ताने मी सर्व शिवभक्तांसाठी एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी वेगवेगळे कार्यकर्ते उपस्थित होते. मी मला जे स्टेटस आवडतात ते स्टेटसला ठेवत असतो. एखाद्या सर्वसामान्याने केलेले फोटो किंवा रिलही मी स्टेटसला ठेवतो. माझा तो फोटो खूप चांगला आला होता. मला तो आवडला. त्यामुळे मी टाकला. प्रसारमाध्यमांनी त्यावर चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जुने शिवजयंतीचे फोटो टाकायला लागले. यानंतर मग मी शिवसेनेत जाणार अशा चर्चा रंगल्या. हा रिल टाकायचा माझ्या डोक्यातला विषय नाही. बऱ्याच दिवसांनी माझा चांगला फोटो आला त्यामुळे टाकला," असे मत रवींद्र धंगेकर यांनी मांडले.
23 Feb 2025 11:38 AM (IST)
शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये दोन महिन्यांपूर्वी केस गळती ने राज्यात खळबळ उडाली होती. यावेळी केलेल्या संशोधनानुसार रेशन मधील गव्हाच्या घटकांमध्ये सेलेनियमच्या घटकामुळे केस गळती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सेलेनियम हा अत्यंत घातक आहे. केवळ केस गळतीच नाही, तर हृदय आणि किडनी या संबंधित इतर अनेक आजारही होऊ शकतात असेही समोर आले आहे. सेलेनियम युक्त गहू घातक असेल तर राज्य शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळणं थांबवलं पाहिजे आणि वितरित केलेला गहू राज्य शासनाने जप्त केला पाहिजे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केली आहे.
23 Feb 2025 11:19 AM (IST)
“साहित्य संमेलने ही आता नित्याची बाब झाली आहे. मराठी साहित्यिक व कलावंत हे कोणतीही भूमिका धड घेत नाहीत आणि सरकारशी जुळवून घेण्यातच ते स्वत:ला धन्य मानतात. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा असो नाहीतर राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा, महाराष्ट्राचे साहित्यिक आणि कलावंत पुढाकार घेऊन काहीच करत नाहीत. अशा सगळ्यांचे एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे," अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून साहित्य संमेलनावर करण्यात आली.
23 Feb 2025 10:51 AM (IST)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मस्साजोगला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा देखील केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. जरांगे हे बीडच्या दाऱ्यावर असताना एक घटना घडली आणि त्यानंतर आता गुन्हा देखील दाखल झाला आहे.
23 Feb 2025 10:50 AM (IST)
विधानसभा जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे व भाजप महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे ‘कॅश फॉर व्होट’चाच प्रकार होता. निवडणुका संपल्यावर सरकार नावाचा बदमाश भाऊ निकष व नियमांचा चाबूक घेऊन या लाडकी बहीण योजनेवर तुटून पडला आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे ‘कॅश फॉर व्होट’चाच प्रकार होता, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली.