Maharashtra Breaking News
25 Oct 2025 11:35 AM (IST)
राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता कठोरपणे आळा बसणार आहे. घुसखोरी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, बांगलादेशी घुसखोरांची ‘ब्लॅकलिस्ट’ तयार करण्याचे आणि त्यांच्या रेशनकार्डची पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. तसेच, नवीन शिधापत्रिका (रेशनकार्ड) वितरणासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. या संदर्भात शासनाने जारी केलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार (GR) खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
25 Oct 2025 11:30 AM (IST)
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने (Cyber Wing) ऑनलाइन गुंतवणूक फसवणुकीबाबत नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत भारतातील ३०,००० हून अधिक लोकांची गुंतवणूक फसवणुकीच्या नावाखाली १,५०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्यात बळी पडलेल्यांपैकी ६५ टक्के प्रकरणे एकट्या बंगळूरू, दिल्ली-एनसीआर आणि हैदराबादमध्ये घडली आहेत.
25 Oct 2025 11:25 AM (IST)
फलटण येथील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. सातारा ग्रामीण पोलिसांनी आज शनिवार (२५ ऑक्टोबर) पहाटे सुमारे चार वाजता ही कारवाई केली. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
25 Oct 2025 11:20 AM (IST)
शनिवारी (२५ ऑक्टोबर) जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला. जपानच्या होक्काइडो येथे ५.७ तीव्रतेचा भूकंप झाला. सुदैवाने या भूकंपात कोणत्याही जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. परंतु आणखी एकदा भूकंपाच्या जोरदार झटकाच्या इशारा देण्यात आला आहे. होक्काइडो हे जपानचे दुसरे सर्वात मोठे बेट आहे.
25 Oct 2025 11:15 AM (IST)
एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सिंगापूर येथे एका प्रीमियम रुग्णालयात काम करणाऱ्या एका भारतीय परिचारिकेला
पुरुषाटची छेडछाड केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिला दोन वर्ष, दोन महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेने सिंगापूरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीने स्वत: न्यायालयात गुन्हा कबुल केला आहे. २१ जून रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्या दोनम दिवसांनी तिला अटक करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) रोजी सुनावणी झाली होती.
25 Oct 2025 11:09 AM (IST)
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते.जीवनशैलीत होणाऱ्या चुका, आहारातील बदल आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
25 Oct 2025 11:05 AM (IST)
केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाजीपूर येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. त्यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू यादव, तेजस्वी यादव आणि काँग्रेससह विरोधी महाआघाडीवर टीका केली. नड्डा म्हणाले की लालू आणि राबडी यांनी बिहारला अंधाराच्या युगात ढकलले होते, परंतु आज एनडीए सरकार वेगाने विकासकामे करत आहे.
25 Oct 2025 10:55 AM (IST)
येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीचा (महायुती) फॉर्म्युला अंतिम झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
25 Oct 2025 10:45 AM (IST)
मुंबईतील कांदिवली (पश्चिम) येथे दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून दोन समुदायांमध्ये झालेल्या वादात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मारामारी आणि मारहाणीच्या आरोपाखाली तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
25 Oct 2025 10:35 AM (IST)
भारतीय संघाचे दुसरे यश विरोधी संघाचा कर्णधार मिशेल मार्शच्या रूपात आले. अष्टपैलू अक्षर पटेलने त्याला गोलंदाजी करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. मार्शने बाद होण्यापूर्वी एकूण ५० चेंडूंचा सामना केला. मार्शने ८२.०० च्या स्ट्राईक रेटने ४१ धावा केल्या, त्यात पाच चौकार आणि एक षटकार मारला.
25 Oct 2025 10:25 AM (IST)
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या १३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार, सर्व्हे ऑफ इंडिया (एसएसआय) ने या नाव बदलाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
25 Oct 2025 10:15 AM (IST)
हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये आवळा पावडर, कोरफड जेल आणि खोबऱ्याचे तेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर केस विंचरून केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत संपूर्ण केसांना लावून घ्या. त्यानंतर ४५ मिनिटं ठेवून शॅम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या समस्या कमी होतील आणि केसांची वाढ होईल. कोरफड जेलमुळे केसांवरील नैसर्गिक चमक वाढेल आणि केस सुंदर दिसतील.
25 Oct 2025 10:03 AM (IST)
Xiaomi TV S Pro Mini LED 2026 अखेर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा लेटेस्ट टिव्ही त्यांच्या नवीन Redmi K90 सीरीज स्मार्टफोनसह सादर केला आहे. Xiaomi च्या या लेटेस्ट स्मार्ट टिव्हीमध्ये 98-इंच 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टिव्ही XM9000 चिपसह लाँच करण्यात आला आहे. ज्याची पीक ब्राइटनेस 5,700 निट्स आहे. Xiaomi TV S Pro Mini LED 2026 मॉडेलला 3,864 डिमिंग जोनसह लाँच करण्यात आले आहे. हा Android टिव्ही HyperOS 3 वर आधारित आहे. स्मार्टटिव्ही, स्मार्टफोन सिरीज आणि स्मार्टवॉचसह Redmi Projector 4 Pro देखील लाँच करण्यात लाँच करण्यात आला आहे.
25 Oct 2025 09:55 AM (IST)
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 27 ऑक्टोबरपासून पुढील तीन दिवस ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
25 Oct 2025 09:45 AM (IST)
दिंडोरी : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील चौसाळे गावात जुन्या भाडणांच्या कुरापती व सोडवासोडवीत झालेल्या भांडणात १८ वर्षीय तरुणाचा खून झाला असून, आणखी एक युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली.
25 Oct 2025 09:35 AM (IST)
Gold–Silver Price Crash Today: भारतात 25 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,436 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,399 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,327 रुपये आहे. भारतात 25 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,360 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,270 रुपये आहे. भारतात 25 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 154.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,54,900 रुपये आहे.
25 Oct 2025 09:25 AM (IST)
टेक कंपनी Xiaomi चा सबब्रँड असलेल्या रेडमीने त्यांचे लेटेस्ट स्मार्टवॉच Redmi Watch 6 अखेर लाँच केले आहे. हे लेटेस्ट स्मार्टवॉच अपडेटेड डिझाइन आणि अधिक चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आले आहे. रेडमीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंचाचा AMOLED कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 432×514 पिक्सेल आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 82 टक्के आहे. या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 2000 निट्स आणि रिफ्रेश रेट 60 Hz आहे, जो ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतो. या वॉचला 2.5D कर्व्ड ग्लास आणि अनेक वॉच फेससह बाजारात लाँच करण्यात आले आहे.
25 Oct 2025 09:15 AM (IST)
उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने आठ जणांना चिरडल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आग्रा-हायवेवर शनिवारी पहाटे घडली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून, त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. पोलिसांनी चालकाविरोधात गंभीर निष्काळजीपणाने वाहन चालवणे आणि गैरहत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
25 Oct 2025 09:11 AM (IST)
सीताबर्डी उड्डाणपुलाच्या रहाटे कॉलनीकडील उतारावर मोठा अपघात झाला. मात्र, वाहनचालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने पुढील दुर्घटना टळली. पुलाच्या उतारावर असलेल्या खोल खड्ड्यामुळे दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली. मागून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखत महिलेला वाचवण्यासाठी तात्काळ ब्रेक लावला.
25 Oct 2025 09:10 AM (IST)
भारतामध्ये या आठवड्यात भौतिक सोन्याची (Physical Gold) मागणी घटलेली दिसून आली आहे. अनेक खरेदीदारांनी सोन्याचे दर आणखी खाली येतील या अपेक्षेने खरेदी तात्पुरती थांबवली आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा त्या बाजारांकडे कल वाढला आहे. याउलट, भारतातील डीलर्सनी या आठवड्यातही अधिकृत देशांतर्गत दरांवर ६% आयात शुल्क (Import Duty) आणि ३% विक्री कर (Sales Tax) धरून प्रति औंस २५ डॉलर्सपर्यंतचा प्रीमियम कायम ठेवला आहे. हा दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. बाजारातील तज्ञांच्या मते, आगामी सणासुदीच्या काळात मागणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे, परंतु खरेदीदार सध्या दर घटण्याच्या प्रतीक्षेत संयम बाळगून आहेत.
25 Oct 2025 09:10 AM (IST)
भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी २,००० रुपये जमा केले जातात. दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये आता २१व्या हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. सूत्रांनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. वर्षातून एकूण तीन हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
25 Oct 2025 09:09 AM (IST)
हॉलीवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मालिका ‘9-1-1: नॅशव्हिल’ मधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री इसाबेल टेट हिचे वयाच्या केवळ २३व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इसाबेल गेल्या काही महिन्यांपासून एका दुर्मिळ आजाराशी झुंज देत होती. उपचार सुरू असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या आकस्मिक निधनाने हॉलीवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सहकलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून इसाबेलला श्रद्धांजली अर्पण केली असून, तिच्या अभिनयातील सहजता आणि समर्पणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
Marathi Breaking news live updates : सातारा जिल्ह्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे. फलटण पोलिसांनी या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर दोघेही फरार होते, मात्र अखेर प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आत्महत्येपूर्वी डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या दोघांची नावे नमूद केली होती. त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळासोबतच बलात्काराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आता दुसऱ्या आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू आहे.






