संग्रहित फोटो
मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. भाजपच्या एकाही कार्यकर्त्यांने बेईमानी केली तर याद राखा, सर्वांचे फोन सर्विलन्सवर टाकलेले असून, तुम्ही व्हाट्सअपवर कोणाशी काय बोलता, कोणाशी काय संवाद साधता हे सर्व आम्हाला कळते, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. हा विषय फक्त भाजप कार्यकर्त्यांचा नसून, विरोधकांचेही फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
सत्तेतील मित्रपक्षांवर भाजपाकडून पाळत
विरोधकांचे मोबाईल सर्विलन्सवर ठेवल्याच्या प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेतील मित्रपक्षांवर भाजपा पाळत ठेवत आहे. मोबाईल सर्विलन्सवर ठेवणे हे भाजपासाठी काही नवे नाही. भाजपा सरकारने याआधी पेगॅसेस सारखे प्रकार केले आहेत. राज्यात रश्मी शुक्ला या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने जवळपास ५० नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते पण फडणवीस पुन्हा सत्तेत येताच या शुक्ला यांना पोलीस प्रमुखपदी बढती देण्यात आली. आता भाजपावाले विरोधकांच्या बाथरुम, संडास मध्येही कॅमेरे लावायला मागेपुढे पहाणार नाहीत कारण ते संस्कृती व सभ्यतेच्या पुढे गेले आहेत, ही भाजपाची मोडस ऑपरेंडी आहे. पण चंद्रशेखर बावनकुळे हे लवकरच आपल्या विधानावर घुमजावही करतील.
संघ अराजक निर्माण करणारी संस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक अनोंदणीकृत संस्था आहे. या संघटनेमुळे देशात अराजकता निर्माण होईल, जाती जातींत, धर्माधर्मांत भांडणे होतील असे लेखी स्वरूपातील पत्र खुद्द तत्कालीन गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी लिहून ठेवलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाच्या औचित्याने संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथील व्हरायटी चौकात पूजनीय महात्मा गांधीजी यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. जी संघटना केवळ महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा द्वेष करण्यासाठी निर्माण झाली, त्या संघटनेने आपल्या शताब्दी महोत्सवानिमित्त महात्मा गांधीजींना नतमस्तक होणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला वैचारिक पराभव मान्य केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली संघटना बरखास्त करावी अशी काँग्रेस पक्षाची संघाचे १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मागणी आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राष्ट्रध्वज मान्य नव्हता. पण अलीकडच्या काळात कुणीतरी बाहेरच्या माणसाने तिथे तिरंगा फडकवल्याने नाईलाजास्तव संघाने तिरंगा स्वीकारला मात्र अद्यापही त्यांनी भारतीय संविधान स्वीकारले नाही. त्यामुळे संघाने त्यांची संघटना बरखास्त करावी, आपल्या संस्थेची नोंदणी करावी, महात्मा गांधीजी यांचे एक चित्र आपल्या मुख्यालयात लावावे आणि भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत सशक्त भारत घडवण्याकरिता पुढील वाटचाल करावी अशी आमची अपेक्षा आहे, असं सपकाळ म्हणाले.






