Maharashtra Breaking News
25 Aug 2025 11:04 AM (IST)
मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतात दिसतात. अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात एका तरुणाने दारुच्या नशेमध्ये राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
25 Aug 2025 11:01 AM (IST)
भारताची ओळख म्हणजे अध्यात्म, संस्कृती आणि प्राचीन परंपरांनी भरलेली भूमी. येथे असंख्य मंदिरे आहेत ज्यांच्या मागे रहस्यमय कथा आणि श्रद्धेचा मजबूत पाया दडलेला आहे. अशाच मंदिरांपैकी एक आहे तामिळनाडूमधील “आदि विनायक मंदिर”, जिथे भगवान गणेशाचे विलक्षण मानवी मुख असलेले रूप भक्तांना दर्शन देते. सहसा आपण गणपती बाप्पाला हत्तीचे मुख असलेले पाहतो, पण या मंदिरात ते अगदी मानवाच्या चेहऱ्यासह पूजले जातात.
25 Aug 2025 10:55 AM (IST)
भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.
25 Aug 2025 10:45 AM (IST)
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चाललेला दिसून येत आहे. मनोज जरांगे वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी लढा देत असून यावर अजूनही चर्चा चालू आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जरांगे यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. बातमी सविस्तर वाचा...
25 Aug 2025 10:33 AM (IST)
भारतीय निवडकर्त्यांनी आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची निवड केली आहे. जिथे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील संघात दिसत आहे. तथापि, शुभमन गिलच्या प्रवेशानंतर सॅमसनचे स्थान धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, आता त्याने या सर्व वृत्तांना बॅटने उत्तर दिले आहे. आशिया कप २०२५ पूर्वी, संजूने १४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने एक शानदार शतक झळकावले आहे. या शतकामुळे त्याच्या संघाने रोमांचक सामना जिंकला आहे.
25 Aug 2025 10:19 AM (IST)
कोलकाता येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील साऊथ साऊथ कोलकाता लॉ कॉलेज येथे सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. आधी एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले. त्यांनतर पीडितेला ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आला.
25 Aug 2025 10:10 AM (IST)
फ्री फायर हा एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असते. गेममध्ये प्लेअर्सना सुरुवातीलाच एका आयलँडवर उतरवले जाते. या आयलँडवर प्लेअर्सना सेफ झोन संपण्यापूर्वी तुम्हाला शक्य तितक्या शत्रूंना मारून मोठा स्कोअर करायचा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शत्रूंवर विजय मिळवणं हेच प्लेअर्सचे ध्येय असते. यासाठी त्यांना वेगवेगळ्या गेमिंग आयटम्सची गरज असते. प्लेअर्सना हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी कोणतेही डायमंड खर्च करावे लागू नयेत आणि गेमिंग आयटम्स मोफत मिळावेत, यासाठी गरेना सतत रेडिम कोड्स जारी करत असते. बातमी सविस्तर वाचा
25 Aug 2025 10:01 AM (IST)
पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने पुण्यातील त्या खाजगी रुग्णालयालाही नोटीस बजावली आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले. विभागाने सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी १० वाजेपर्यंत रुग्णालयाला संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.
25 Aug 2025 09:57 AM (IST)
Shinde-Fadnavis Dispute: राज्यातील सत्ताधारी युतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. नगरविकास विभागाच्या कारभाराबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीसांनी ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या असल्याचे समजते.
25 Aug 2025 09:56 AM (IST)
गुजरातच्या त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात, पंतप्रधान मोदी अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक विकास, वाहतूक व्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्र मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी हंसलपूरमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उद्घाटन करून या दौऱ्याची सुरुवात करतील. यासोबतच, ते १०० देशांमध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवतील.
25 Aug 2025 09:50 AM (IST)
महिला डीपीएल २०२५ चा अंतिम सामना रविवारी, २४ ऑगस्ट रोजी रात्री दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. चार संघांच्या महिला दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना रोमांचक होता, कारण विजेता संघ फक्त १ धावेने निश्चित झाला. साउथ दिल्ली सुपरस्टार्स महिला संघाचा सामना सेंट्रल दिल्ली क्वीन्सशी झाला. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
25 Aug 2025 09:48 AM (IST)
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना नालासोपारा पश्चिम येथे उघडकीस आली आहे. नालासोपारा येथील एका अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षकाचे नाव राहुल दुबे असे असून, त्याचे वर्तन दिवसेंदिवस संशयास्पद आणि त्रासदायक होत असल्याने पीडित मुलगी धास्तावली होती. अखेर तिने धैर्य दाखवत आपल्या पालकांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
मुलीच्या तोंडून सत्य समजताच पालकांनी थेट अकॅडमी गाठून शिक्षकाला जाब विचारला. दरम्यान, संतापाच्या भरात पालक व स्थानिक नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
25 Aug 2025 09:35 AM (IST)
अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल भाषणात फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीत व्याजदर कपातीचे संकेत देण्यात आले आहेत. यााचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. २५ ऑगस्ट रोजी आज जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९५३ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५५ अंकांनी जास्त होता.
25 Aug 2025 09:30 AM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील शेवटचा सामना २४ ऑगस्ट रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी केली आणि २७६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके झळकावली, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप मागे पडला. तथापि, शेवटचा सामना गमावल्यानंतरही, दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली.
25 Aug 2025 09:25 AM (IST)
25 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,161 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,314 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,620 रुपये आहे. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,140 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,610 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,204 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 119.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,19,900 रुपये आहे.
25 Aug 2025 09:20 AM (IST)
23 ऑगस्ट रोजी बिग बॉस 19 सीझनचा शुभारंभ झाला आहे. या सीजनमध्ये 16 स्पर्धकांनी घरामध्ये एन्ट्री केली आहेत तर शहबाज बदेशा याला स्टेजवरूनच एलिमिनेट करण्यात आले आहे. अनेक टेलीव्हिडनचे कलाकार त्याचबरोबर इंटरनॅशनल कलाकार देखील यावर्षी या बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये सहभागी झाले आहेत. आता बिग बॉसने एक नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धक हे पहिल्याच दिवशी एकमेकांशी वाद घालताना पाहायला मिळाले. घरामध्ये एन्ट्री करून 24 तास ही पूर्ण झाले नसताना आता घरात वादाची ठिणगी पेटली आहे.
25 Aug 2025 09:15 AM (IST)
मुंबईच्या नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. IITN अकॅडमीच्या शिक्षकाकडून एका १६ वर्षाच्या विध्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा समोर आलं आहे. याबाबतची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अकादमीमध्ये जाऊन शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. त्यानंतर पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
25 Aug 2025 09:09 AM (IST)
Navi Mumbai – सिद्धेश प्रधान : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेतर्फे प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभागरचनेत २८ प्रभाग असून १११ नगरसेवक असणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्याची मुदत ४ सप्टेंबरपर्यत देण्यात आली आहे. मात्र या प्रभाग रचना जाहीर झाल्यावर ठाकरे गटाने मात्र यावर आक्षेप घेतला. भाजपा व शिंदे गटाच्या प्रभावाखाली ही प्रभाग रचना केली गेल्याचा स्पष्ट आरोप ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख समीर भगवान यांनी केला. याबाबत ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती देणारे पत्र देण्यात येणार असल्याचे समीर बागवान यांनी सांगितले.
25 Aug 2025 09:05 AM (IST)
संसदेत गुरुवारी (२१ ऑगस्ट) ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल’ दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. या नव्या कायद्याचा सर्वात मोठा फटका फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ला बसला आहे. बिल मंजूर झाल्यानंतर ड्रीम ११ ने भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व थांबवण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अधिकृत पत्र पाठवले आहे. ड्रीम ११ च्या या निर्णयामुळे आशिया कपच्या अगोदरच बीसीसीआयला नवीन प्रायोजक शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
Marathi Breaking news live updates: राज्यातील सत्ताधारी युतीत कनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. नगरविकास विभागाच्या कारभाराबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
केंद्र सरकारच्या योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीसांनी ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या असल्याचे समजते.