कोकणातील जगप्रसिद्ध असणारा गणेशोत्सव (फोटो- एआय/चॅटजीपीटी)
पुणे/तेजस भागवत: लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. ६४ कलांचा अधिपती आणि विघ्नहर्ता आपल्या घरी आपली सेवा करून घेण्यासाठी येणार आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठा खुलल्या आहेत. घरोघरी सजावटीची, प्रसादाची तयारी सुरु झाली आहे. गणेशोत्सव म्हटले की आपले मन, आपली पाऊले वळू लागतात ती स्वर्गापेक्षा सुंदर असलेल्या आपल्या कोकणभूमीकडे. भगवान परशुरामांनी निर्माण केलेल्या या कोकणभूमीचे आणि गणेशोत्सवाचे एक अतूट नाते आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कोकणी माणूस असला तरी तो शिमगा आणि गणेशोत्सव या सणांना कोकणातच येतो म्हणजे येतोच. कोकणातील गणेशोत्सव हा केवळ सणापुरता नसतो. त्यामध्ये कोकणातील अनेक लोककला, रूढी, परंपरा यांचा देखील संगम आपल्याला पाहायला मिळतो. कोकणातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. चला तर मग आज या लेखाच्या माध्यमातून कोकणचे आणि बाप्पाचे काय नाते आहे ते जाणून घेऊयात.
कोकणी माणसाचे आणि गणेशोत्सवाचे नाते अतूट आहे. गौरी-गणपती हा कोकणातील सर्वात मोठा सण. आमच्या कोकणाला उगीचच स्वर्गापेक्षा सुंदर असे म्हंटले जात नाही. राजकीय, सामाजिक, लोककला आणि त्यासोबतच सांस्कृतिक व अद्भुत निसर्गाने नटलेले कोकणचे वैभव खरोखरच डोळ्यात, मनात साठवण्यासारखे आहे. त्यातच आता आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. कोकणी माणसाची तयारी खूप महिने आधीच सुरु झालेली असते.
कोकणातील आकर्षक समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि येथील गणेशोत्सव पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. दरवर्षी लाखो चाकरमानी.. नव्हे नव्हे, लाखो ‘कोकणवासीय‘ लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी कोकणात येतात. अनेकांना देवाच्या दर्शनासाठी देवळात जावे लागते, मात्र शिमगा आणि गणेशोत्सवात देवच आमच्या घरी आम्हाला दर्शन देण्यासाठी येतो अशी भावना प्रत्येकाच्या मनात वास करते.
कोकणातील गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक वाडीत, गावात म्हणजेच प्रत्येक घरात बाप्पा विराजमान होतात ही कोकणच्या या सणाची विशेषता आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी खूप आधीच सुरू होत असते. कोकणवासीय खूप महिने आधीच गावाक जाण्यासाठी रेल्वे, बसचे आरक्षण करून ठेवतात. लाखो लोक प्रवास करून आपल्या गावी येतात. जरी हा प्रवास पूर्णपणे सुखकर नसला तरी बाप्पाच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करून कोकणवासी आपल्या गावी जातातच. गेले अनेक वर्षे सुरु असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम आणि पडलेले खड्डे हे कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी दरवर्षीच त्रासदायक ठरतात. जाऊद्यात.. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण (एकही खड्डा पडणार नाही याची काळजी घेऊन) व्हावा आणि यासाठी संबंधितांना सुबुद्धी यावी हीच गणरायाकडे प्रार्थना….
कोकणातील गणेशोत्सवात अनेक रूढी आणि परंपरा देखील आहेत. अनेक लोककला या सणासुदीच्या काळात सादर केल्या जातात. प्रत्येक भागात याचे थोडे बदलते स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. कोकणवासीय सजावटीचे साहित्य अनेकदा मुंबईतूनच गावी घेऊन येतात. काही दिवस साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. आगमनाच्या दिवशी पाटावर बाप्पा विराजमान होतात आणि गावकरी आपापल्या घरी बाप्पाचे स्वागत करतात. विधिवत पूजा केली जाते.
बाप्पा विराजमान झाले की दीड दिवस, पाच, सात, अकरा आणि एकवीस दिवस हा सण सुरु असतो. बाप्पाला मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो. प्रत्येक वाडीवाडीत भजनांचे, आरत्यांचे सूर ऐकू येतात. लोकलला सादर केल्या जातात. या काळात खूप आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. दरवाजात रांगोळ्या काढल्या जातात. माटवी बांधली जाते. पहिल्या दिवशी पाच भाज्या व मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
प्रत्येकाच्या घरी भजनी मंडळ आमंत्रित केलेले असते. रात्री उशिरापर्यंत आरत्या, भजने आपल्याला ऐकू येत असतात. मात्र हे सगळे करत असताना कुठेही गडबड, गोंधळ आणि वादविवाद आपल्याला पाहायला मिळत नाही. हीच कोकणी माणसाची खरी ताकद आहे. मिळून मिसळून मोठ्या उत्सहात हा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवात कोकणात खास करून जाखडी नृत्य (शक्ती-तुरा) सादर केले जाते. ही लोकलला खास करून रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळते. प्रत्येक जिल्ह्यानुसार या लोककलांमध्ये बदल आणि विवीधता आपल्याला पाहायला मिळते. कोकणात गौरी-गणपती असतात. गौरीचे आगमन आणि विसर्जन हे देखील कोकणात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोकणातल्या गेणशोत्सवाला एक वेगळीच महती आणि परंपरा आहे.
जाखडी म्हणजे नक्की काय?
जाखडी म्हणजे कोकणातील एक लोककलेचा प्रकार आहे. शक्ती म्हणजे माता पार्वतीचे तर तुरा म्हणजे भगवान शंकराचे रूप मानले जाते. ही कला सादर करत असताना यामध्ये स्तवन, गण, गवळण आणि पद असा क्रम ठरलेला असतो. हे नृत्य खास करून गणेशोत्सवातच का मोठ्या प्रमाणात सादर केले जाते याबाबत उल्लेख सापडून येत नाही. पण यामुळे कोकणातील लोक आपली संस्कृती, महत्व आणि एकमेकांमध्ये असलेले प्रेम आजही टिकवून आहेत. या लोककलेच्या माध्यमातून हल्लीच्या काळात समाज प्रबोधन देखील होताना पाहायला मिळते. त्याप्रकारे रायगड आणि सिंधुदुर्ग म्हणजेच संपूर्ण कोकणात अशा अनेक लोककला आहेत, ज्यामुळे कोकणची ओळख आजही जगभरात असल्याचे दिसून येते. कोकणी माणसासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
आता आपण विसर्जनाबाबत थोडेसे जाणून घेऊयात. कोकणातील विसर्जन सोहळा प्रेक्षणीय असतो. घरोघरी आरत्या होतात. प्रसादाचे वाटप होते. सर्वांचे भले कर, सर्वांच्या अडचणी दूर कर, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्होवो अशी प्रार्थना गणरायाला केली जाते. सगळी दुःख विरून जाऊदेत आणि सुखाचा, समाधानाची कृपा आमच्यावर कर असे म्हणत जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातो. एका रांगेत सर्व मुर्त्या ठेवल्या जातात . गूळ, खोबऱ्याचा प्रसाद दाखवला जातो. सुगंधी उदबत्त्या लावल्या जातात.
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र प्रत्येकाचे मन बाप्पाला निरोप देत असताना रडतच असते. दरम्यान आता आपल्याला आपल्या नातेवाकांचा देखील निरोप घेऊन शहराकडे परत जायचं आहे, हा विचार मनात आला की धस्स होते. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. मात्र पुढच्या वर्षी त्याच जोमाने गणरायाच्या सेवेसाठी गावाकडे यायचं आहे हा आनंदच विचार मनात करून कोकणवासीय शहराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होतो.