
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या
Marathi Breaking news updates: निवडणूक आयोग आज दुपारी सव्वा चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) संदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात SIR प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आयोग घेऊ शकतो. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, आगामी काळात ज्याठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांचा समावेश या पहिल्या टप्प्यात होऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांचा यात समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांनाही पहिल्या टप्प्यात स्थान मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
27 Oct 2025 07:07 PM (IST)
घाटकोपर: घाटकोपरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. घाटकोपरमधील १३ मजली रविशा टॉवरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
27 Oct 2025 06:46 PM (IST)
अंबरनाथ : मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. चांगला मोबाईल असावा हे प्रत्येकाची एक गरज आणि स्वप्न झाल आहे. मात्र महागडे मोबाईल चोरून विकणाऱ्यांची एक मोठी साखळी निर्माण झाली आहे. अंबरनाथमध्ये ४५ पेक्षा जास्त मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी या पोलिस स्टेशन ला आल्या होत्या. त्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला आणि मोबाईल चोरांना अटक केली आहे. दिवाळीच्या काळात या मोबाईल चोरांचा सुळसुळाट होता त्यामुळे गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाईल चोरले होते. मात्र आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
27 Oct 2025 06:24 PM (IST)
IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच संपली आहे. आता दोन्ही संघ २९ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहेत, ज्याची सुरुवात कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर होणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल.
27 Oct 2025 06:04 PM (IST)
Rohit Pawar on BJP Office: मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप जेष्ठ नेते अमित शाह हे आज (दि.27) मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संशय उपस्थित केला आहे. भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन झालेली जागा नक्की कुणाची? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
27 Oct 2025 05:49 PM (IST)
रायगड जिल्हा परिषदेचे माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी बांधलेले व्यापारी संकुलात लवकरच बाजार भरणार आहे.या संकुलातील 104 गाळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा काढण्यात आली आहे.दरम्यान या निविदा प्रक्रिया मध्ये नेरळ संकुलात नक्की टपरी धारक यांना गाळे मिळणार की अन्य कोणाला याबाबत खुलासा नसल्याने नेरळ गावातील फुटपाथ रिकामे होणार का? हा प्रश्नच आहे.
27 Oct 2025 05:16 PM (IST)
एमजी कंपनी अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. प्रीमियम सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी MG M9 एमपीव्ही क्रिकेटपटू आणि बॉलिवूड स्टार्समध्ये लोकप्रिय होत आहे. गायक शंकर महादेवन यांनी अलीकडेच ही एमपीव्ही खरेदी केली आहे. MG M9 ची भारतीय बाजारातील एक्स-शोरूम किंमत 69.90 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
27 Oct 2025 05:04 PM (IST)
बिहारप्रमाणे देशातील १२राज्यांमध्येही विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रिया केली जाणार आहे. अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. ज्ञानेश कुमार म्हणाले, बिहारमध्ये SIR च्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, SIR चा दुसरा टप्पा आता इतर निवडक राज्यांमध्ये लागू केला जाईल. हा दुसरा टप्पा १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केला जाईल.
27 Oct 2025 04:50 PM (IST)
मशहूर गायक आणि संगीतकार रघु दीक्षित यांनी आयुष्यात पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. ५० वर्षांच्या वयात त्यांनी स्वतःपेक्षा १६ वर्षांनी लहान फ्लूटिस्ट आणि गायिका वरिजाश्री वेणुगोपालशी लग्न केले आहे. हे लग्न १४ ऑक्टोबर २०२५ रोजी खासगी सोहळ्यात पार पडले, ज्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झालं आहेत.
27 Oct 2025 04:40 PM (IST)
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात वादळी वारे, विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासांत नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे ७६० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.
27 Oct 2025 04:35 PM (IST)
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार्स उपलब्ध आहेत. यातही काही एसयूव्ही अशा आहेत, ज्यांच्या विक्रीत नेहमीच वाढ होताना दिसते. अशीच एक लोकप्रिय Hyundai Venue. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी लवकरच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन जनरेशनची व्हेन्यू लाँच करणार आहे. चला या एसयूव्हीच्या सेफ्टी फीचर्स, लाँच तारीख आणि अपेक्षित किंमत याबद्दल जाणून घेऊयात.
27 Oct 2025 04:30 PM (IST)
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात वादळी वारे, विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासांत नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे ७६० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.
27 Oct 2025 04:20 PM (IST)
राज्यात यंदा मान्सूनने दगडधोंड्यांप्रमाणे बरसत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्याच पावसाने शेतकऱ्यांच्या घरी आजा हवालदिल वातावरण निर्माण केले आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पावसाळा संपत नाही आणि लांबलेल्या पावसामुळे भाताच्या शेतीचे मोठे नुकसान सुरू आहे. भात शेतात कापून ठेवलेला तर काही ठिकाणी शेतात उभा असलेला भाता पीक शेतात कोसळले आहे. तालुक्यात ९० टक्के भाताचे पीक पाण्यात डुबले असून भाताच्या पिकाला मोड येण्याची शक्यता आहे. दरम्यान पाऊस कधी थांबणार याकडे शेतकरी वर्गाचे डोळे लागून राहिले आहेत.
27 Oct 2025 04:15 PM (IST)
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने फार्मासिस्ट (Pharmacist), टेक्निशियन बी (Technician B) सह विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन (Vacancy Notification) जारी केले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार इसरोच्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर जाऊन १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे इसरो एकूण ४४ पदांवर नियुक्ती करणार आहे.
27 Oct 2025 04:10 PM (IST)
दिवाळीचा सण आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. अलीकडच्या काळात देशातच नव्हे तर परदेशातही दिवाळीचा सण साजरा होऊ लागला आहे. पण याच दिवाळीला गालबोट लागले आहे. यंदाची दिवाळी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली. गेल्या महिनाभरात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृ्ष्टीमुळे पिकांवर रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भाव वाढला, उत्पादनात मोठी घट झाली. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे उर्वरित उत्पादन बाजारात आणले त्यांना योग्य किंमत मिळाली नाही.
27 Oct 2025 04:02 PM (IST)
खोल मानवी भावना आणि नैतिक दुविधांनी भरलेली एक नवीन कथा मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या “वध २” च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट कधी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आपण आता जाणून घेणार आहोत.
27 Oct 2025 03:56 PM (IST)
क्वालालंपूर येथे पार पडलेल्या ASEAN Summit आसियान शिखर परिषदेत एक अनोखा प्रसंग घडला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump उपस्थित असतानाही संपूर्ण लक्ष वेधून घेतले ते भारताने.
27 Oct 2025 03:48 PM (IST)
राज्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतीला मोठा फटका बसला. संगमनेर तालुक्यात स्वाती नक्षत्रात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.
27 Oct 2025 03:42 PM (IST)
इस्त्रायल आणि लेबनॉनमध्ये अनेक काळापासून संघर्ष सुरू आहे. इस्त्रायलने पुन्हा एकदा दक्षिण लेबनॉनवर पुन्हा हवाई हल्ला केला आहे. इस्त्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये तीव्र हल्ले केले आहेत.
27 Oct 2025 03:31 PM (IST)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
27 Oct 2025 03:22 PM (IST)
मनोज बाजपेयी यांच्या “द फॅमिली मॅन” मालिकेचे शेवटचे दोन सीझन सुपरहिट ठरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून चाहते तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते सतत अपडेट्सची विनंती करत आहेत, ईमेल पाठवत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत आहेत, तिसऱ्या सीझनबद्दल अपडेट्स मागत आहेत.
27 Oct 2025 03:09 PM (IST)
सावन वैश्य, नवी मुंबई: सुनियोजित नवी मुंबई शहरात वाहतुकीचे तसेच पार्किंगचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे वाहन चालवताना नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. विशेषतः अत्यावश्यक सेवेतील म्हणजे अग्निशमन दल व रुग्णवाहिकांना यांना घटनास्थळी वेळेवर पोहोचायला उशीर होत असल्याने या विभागाला नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
27 Oct 2025 03:00 PM (IST)
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार अखेर रद्द करण्याची मागणी ईमेलद्वारे केली आहे. दरम्यान हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केल्यावर रवींद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणात मंत्री मुरलीधर मोहोळांवर आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर विशाल गोखले यांनी ट्रस्टला ईमेल करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.
27 Oct 2025 02:50 PM (IST)
महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोड़पति 17’ मध्ये दिसत आहेत आणि जोरदार चर्चेत आहेत. ते सोशल मीडियावरही लोकांचे लक्ष वेधण्यात मागे राहत नाहीत. रात्री उशिरा केलेले त्यांचे ट्विट्स लोकांचे डोके फिरवतात. पुन्हा एकदा त्यांनी काही असे ट्विट केले आहे, ज्यावर यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये अतरंगी प्रतिक्रिया देत आहेत.
27 Oct 2025 02:45 PM (IST)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती, त्यामुळे तो खेळू शकला नाही. अलिकडेच असे उघड झाले की श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो आयसीयूमध्ये होता, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. बीसीसीआयने आता अय्यरच्या दुखापतीबद्दल अधिकृतपणे अपडेट दिले आहे, ज्यामध्ये तो आता वैद्यकीयदृष्ट्या स्वच्छ असल्याचे म्हटले आहे.
27 Oct 2025 02:41 PM (IST)
मनोज बाजपेयी यांच्या “द फॅमिली मॅन” मालिकेचे शेवटचे दोन सीझन सुपरहिट ठरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून चाहते तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते सतत अपडेट्सची विनंती करत आहेत, ईमेल पाठवत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत आहेत, तिसऱ्या सीझनबद्दल अपडेट्स मागत आहेत. आणि अखेर आता निर्मात्यांनी चाहत्यांना खुश करून टाकले आहे. त्यांनी नुकतीच “द फॅमिली मॅन ३” बाबत नवीन अपडेट शेअर केले आहेत.
27 Oct 2025 02:30 PM (IST)
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन टप्प्यामध्ये बिहारमध्ये मतदान पार पडणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. घोषणाबाजी, पोस्टरबाजी आणि आश्वासनांची खैरात वाटणे सुरु आहे. दरम्यान, नालंदा विधानसभा मतदारसंघातील आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. नालंदामध्ये उमेदवाराचे स्वागत एखाद्या राजाप्रमाणे केले आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला असून यामुळे राजा आहे की उमेदवार असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
27 Oct 2025 02:25 PM (IST)
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद संघटनेने महिलांची भरती करण्यासाठी एक नवा प्लॅन केला आहे. या प्लॅनअंतर्गत जैश-ए-मोहम्मद संघटना आता महिलांची भरती करणार असून या महिला भरतीसाठी नवा ऑनलाईन कोर्सही सुरू करणार आहे. ही बातमी अद्याप ताजी असतानाच आता जैशचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा एक ऑडियो समोर आला आहे. या ऑडियो त्याच्या भाषणाचा असून या भाषणात तो महिलांना दहशतवादी कारवायांसाठी कसे तयार करणार, त्यांना कसे प्रशिक्षण देणार, यासंबंधीची माहिती देत आहे.
27 Oct 2025 02:20 PM (IST)
टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी कॉमेडी-कुकिंग शो “लाफ्टर शेफ्स” त्याच्या तिसऱ्या सीझनसह परतणार आहे. या शोच्या नव्याकोऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली आहे आणि “लाफ्टर शेफ्स ३” मधील नवीन कलाकारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी, जुन्या स्पर्धकांसोबत, नवीन स्पर्धक स्वयंपाकाचा अनुभव घेणार आहेत. सीझन १ आणि २ च्या यशानंतर, निर्माते आता सीझन ३ मध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांसह प्रेक्षकांना स्वयंपाक आणि हास्याचा एक डोस देण्याचा विचार करत आहेत. सोशल मीडियावर नवीन स्पर्धकांबद्दल चर्चा तीव्र झाली आहे. चला जाणून घेऊया की यावेळी शोमध्ये कोण कोणते कलाकार सामील होणार आहेत.
27 Oct 2025 02:15 PM (IST)
पुणे: गेले काही दिवस पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या व्यवहारावरून जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बोर्डिंग हाऊस जमीन पुण्यातील गोखले बिल्डर्सला विकण्यात आली होती. दरम्यान आता गोखले बिल्डर्सकडून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
27 Oct 2025 02:10 PM (IST)
महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना पृथ्वी शॉ पहिल्या डावात एकही धाव घेऊ शकला नाही, परंतु दुसऱ्या डावात त्याने ७५ धावा केल्या. पुढच्या सामन्यात त्याच्या बॅटने गर्जना केली आणि त्याने फक्त ७२ चेंडूत शतक झळकावले. यासह त्याने रणजी ट्रॉफीचा विक्रम प्रस्थापित केला. पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा सहावा फलंदाज ठरला. त्याने त्याचे शतक ठोकल्यानंतर द्विशतक देखील पुर्ण केले आहे. पृथ्वी शाॅ याने त्याचे द्विशतक हे 141 चेंडुमध्ये पुर्ण केले आहे.
27 Oct 2025 02:01 PM (IST)
ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे. या तिथींमध्ये कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या नवव्या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा केली जाते. आवळा नवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर लक्ष्मी-नारायण वर्षभर प्रसन्न राहतात.
27 Oct 2025 01:58 PM (IST)
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सीरिज अनेकांना आवडली. ती नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आणि ती प्रचंड हिट ठरली आहे. आर्यन खान इतकी उत्तम मालिका तयार करेल अशी लोकांनि कल्पनाही केली नव्हती. या मालिकेत बॉबी देओल, राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. शशी थरूर यांनी अलीकडेच ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ची प्रशंसा केली आहे. आणि सोबतच आर्यनचे कौतुक देखील ते करताना दिसले आहेत.
27 Oct 2025 01:50 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतीलसुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेऊन मालिका जिंकली होती. त्यानंतर 25 ऑक्टोबरला या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सने पराभूत करून मालिकेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून माजी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करण्यात आले.
27 Oct 2025 01:45 PM (IST)
भारतीय रेल्वेने कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. मुंबई आणि गोवा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे. वाढत्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, रेल्वेने या गाडीच्या फेऱ्याच नाही तर डब्यांची संख्याही वाढवली आहे.
27 Oct 2025 01:35 PM (IST)
मराठी मध्ये एक म्हण आहे “जो दुसऱ्यांसाठी जाळं विणतो, तो स्वतः त्यात अडकतो.” हेच बांग्लादेशचं आज झालं आहे. भारताला इंटरनेट डिप्लोमसीद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणारा बांग्लादेश, आता भारताच्या डिजिटल धोरणामुळे स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे.बांग्लादेशचे सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी भारतासोबत इंटरनेट सहकार्यासाठी एक डील केली होती इंटरनेट डिप्लोमसी जे बांग्लादेशने राजकीय डावपेच रचण्यासाठी वापरले ते शेवटी त्यांच्या देशालाच तोटा देऊन गेले. भारताने दिलेल्या प्रत्युत्तराने बांग्लादेशची इंटरनेट अर्थव्यवस्था हादरली आहे. असं म्हणतात कि “ज्याचे त्याचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर”.
27 Oct 2025 01:25 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली. या कारणामुळे त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याच्या बरगडीला दुखापत झाली आणि अय्यरची प्रकृती बरीच खालावली आहे. अहवालानुसार तो ऑस्ट्रेलियन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या पालकांना ऑस्ट्रेलियाला आणण्याची तयारी सुरू आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होणार असल्याने टीम इंडियासाठी ही खूप वाईट बातमी आहे.
27 Oct 2025 01:15 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई पालिकेसह सर्वच पालिका आणि नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाची निर्धार सभा देखील पार पडणार आहे. याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
27 Oct 2025 01:05 PM (IST)
मुळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या आणि फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डाॅक्टरने आत्महत्या केली. तिने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. दरम्यान, महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांनी माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी भेट घेतली, या भेटीनंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.
27 Oct 2025 01:03 PM (IST)
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथे एका २५ वर्षीय होतकरू अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. सचिन गणेश चांदवडे असे २५ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. सचिनच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलं नाही. परंतु या घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सचिनच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
27 Oct 2025 12:55 PM (IST)
बलात्कार प्रकरणात नाशिक मध्यवर्ती कारगृहात बंदी असलेल्या कैद्याने गळफास घेत आत्महत्या केली. तो बलात्काराच्या गुन्ह्यात येथे 2024 पासून कैद होता. आत्महत्येचं कारण समजू शकले नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
27 Oct 2025 12:45 PM (IST)
ओबीसी समाजाचा प्रचंड मोठा महामोर्चा नागपुरात झाला, तरी सरकार झुकण्यास तयार नाही. बावनकुळे साहेब म्हणतात जीआर फक्त मराठवाड्यासाठी आहे. पण एकदा ओबीसी प्रमाणपत्र मिळाले तर देशात कुठेही लागू होते, वापरले जाऊ शकते. मंत्री महोदय दिशाभूल करत आहेत, या जीआरने ओबीसींचे नुकसान होत आहे. केवळ खुर्चीसाठी ओबीसींच्या हिताकडे दुर्लक्ष करू नका, मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. महायुती सरकारने आणलेला जीआर रद्द करण्यासाठी १ नोव्हेंबरला विदर्भातील ओबीसी नेत्यांसोबत बैठक होणार आहे. जीआर रद्द करण्यासाठी आणि ओबीसींचे नुकसान टाळण्यासाठी पुढील रणनीती ठरवणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
27 Oct 2025 12:35 PM (IST)
नाशिक येथील सातपूर गोळीबार प्रकरणातील लोंढे टोळीचा फरार सराईत गुन्हेगार शुभम चंद्रकांत निकम याला अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यापासून संशयित फरार होता. वरिष्ठ निरीक्षक यांच्या पथकाचे गस्त करत असताना फरार संशयित गौळाणेरोड येथे आल्याचे समजले. पथकाने सापळा रचत संशयिताला घराजवळून ताब्यात घेतले.
27 Oct 2025 12:33 PM (IST)
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामाचा एक भाग म्हणून हडपसर ते दिवेघाटदरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवेघाटात ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिली आहे. या कारणास्तव सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन NHAI तर्फे करण्यात आले आहे. या कालावधीत महामार्गावर सुरक्षा उपाययोजना करण्यात येणार असून, स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने नागरिकांना ब्लास्टिंगदरम्यान रस्ता परिसर टाळण्याचे आवाहन केले आहे.
27 Oct 2025 12:25 PM (IST)
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये जैन समाजाचा मोर्चास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल जैन समाजाने हा मोर्चा काढला आहे. नाशिकच्या अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात
27 Oct 2025 12:15 PM (IST)
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आता 24 तास दर्शन मिळणार आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत ही सुविधा असेल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
27 Oct 2025 12:10 PM (IST)
माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पुण्यातील जैन बोर्डिंगमध्ये दाखल झाले आहे. ते जैन मुनी यांचे आशीर्वाद घेणार आहेत. आजपासून रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग येथेच आंदोवन करणार आहेत. दोन दिवस याविषयी काही बोलणार नसल्याची रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
27 Oct 2025 12:05 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
27 Oct 2025 12:00 PM (IST)
मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) करण्याबाबत निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी साडेचार वाजता ही पत्रकार परिषद होईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबिर सिंग संधूव विवेक जोशी हे यावेळी उपस्थित असतील.
27 Oct 2025 11:50 AM (IST)
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरुन पुण्यात वाद निर्माण झाला आहे. या जमिन व्यवहार प्रकरणामुळे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणी देखील वाढल्या. संपूर्ण राज्यामध्ये हे प्रकरण गाजल्यानंतर जैन बोर्डिंग जमीन व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आला आहे. याबाबत मेल HND ट्रस्टला पाठवण्यात आला आहे.
27 Oct 2025 11:40 AM (IST)
. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे. आता त्याचे रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर 25 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग 35 ते 45 किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 55 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.